स्थायी समितीचे अध्यक्ष ऍड. लांडगे यांच्यासह पाच जणांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

    पुणे : दोन लाखांच्या लाच प्रकरणात एसीबीने अटक केलेले पिंपरी-चिंचवड पालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष ऍड. नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, त्यांनी तपासात तक्रारदार ठेकेदाराला टक्केवारीचे पैशांवर १६ जणांना द्यावे लागतात, असे सांगितले होते. याबाबत आरोपींकडे तपास केला. पण, ते काहीही सांगत नसल्याचे एसीबीच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले आहे.

    स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (वय ५०, रा. भोसरी), त्यांचा स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर किसनराव पिंगळे (वय ५६, रा. भोसरी), शिपाई अरविंद भीमराव कांबळे (वय ५०, रा. भीमनगर, पिंपरी), संगणक ऑपरेटर राजेंद्र जयवंत शिंदे (वय ५१, रा. वाकड) आणि लिपिक विजय शंभुलाल चावरिया वय ३८, रा. धर्मराजनगर) अशी पोलीस कोठडीत वाढ केलेल्यांची नावे आहेत.

    एसीबीने पिंपरी-चिंचवड पालिकेतच छापा कारवाई करत ९ लाखांच्या लाच मागणी प्रकरणात पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये घेताना पकडले होते. पाच जणांना अटक करत त्यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना सुरुवातीला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज (शनिवार) कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले.
    त्यावेळी एसीबीने त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करताना न्यायालयात सांगितले की, अटक आरोपींकडे त्या १६ जणांबाबत तपास केला. पण, ते काहीही सांगण्यास नकार देत आहेत. लांडगे यांनी त्यांच्या मालमत्तेबाबत काहीही माहिती दिली नाही.

    पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. हे एक मोठे रॅकेट असून यात आणखी कोण कोण सामील आहेत, याचा तपास करायचा असल्याने आरोपींच्या पोलिस कोठडीत ७ दिवस वाढ करण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली केली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण घेत न्यायालयाने आरोपींच्या कोठडीत सोमवारपर्यंत वाढ केली.