लाचखोरीच्यानंतर स्थायी समितीची बैठक ‘खेळीमेळी’च्या वातावरणात; तब्बल ४४ कोटींच्या विषयांना मान्यता

लाचखोरीचे प्रकरण घडल्यापासून राष्ट्रवादीचे चार सदस्य स्थायी सभेत सहभागी झाले नाहीत आणि यापुढे होणार नाहीत, आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी जाहीर केले.

    पिंपरी: स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरण अवघ्या २२ व्या दिवशी पूर्णपणे शमले. दोषींवर कारवाईची भाजप प्रदेशाध्यक्षांची घोषणा पोकळ ठरली. तर, स्थायी समिती बरखास्त करा, यापुढे आमचे सदस्य सभेत सहभागी होणार नाहीत अशी वल्गना करणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसने अक्षरशा: लोटांगण घातले. सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेनेचे सदस्य स्थायी सभेत सहभागी झाले. सर्वांनी मिळून खेळीमेळीच्या वातावरणात तब्बल ४४ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता दिली.

    पिंपरी – चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा ऑनलाइन पार पडली. अ‍ॅड. नितीन लांडगे अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील सर्वच म्हणजेच २९ विषयांना मान्यता देण्यात आली. याशिवाय आयत्यावेळच्या सहा अशा तब्बल ४३ कोटी ९८ लाख ५२ हजार २०२ रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली. २२ दिवसांपूर्वीच म्हणजे १८ ऑगस्ट रोजी महापालिका इतिहासात अभूतपूर्व घटना घडली. महापालिका मुख्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी धाड टाकत स्थायी समिती सभापती नितीन लांडगे यांच्यसासह पाच जणांना रंगेहात पकडले. यावरुन विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात घेरले. स्थायी समिती बरखास्त करा, सभापतींनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या केल्या.

    मागील दोन बुधवारी महापालिकेत आंदोलन केले. लाचखोरीचे प्रकरण घडल्यापासून राष्ट्रवादीचे चार सदस्य स्थायी सभेत सहभागी झाले नाहीत आणि यापुढे होणार नाहीत, आम्ही बहिष्कार टाकणार आहोत, असे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी जाहीर केले. परंतु, बरोबर आठव्या दिवशी राष्ट्रवादीने ‘यू – टर्न’ घेतला. राष्ट्रवादीची भूमिका बदलली. राष्ट्रवादीचे चारही सदस्य आजच्या स्थायी सभेत सामील झाले. एकाही विषयाला विरोध दर्शविला नाही. सर्व विषयांच्या मान्यतेला संमती दिली. आम्हाला सभेत सहभागी होण्याचा दुपारी उशिरा निरोप मिळाला. आम्हाला विषयपत्र वाचता आले नाही. त्यामुळे विषयाला विरोध करता आला नसल्याचे अजब स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या स्थायी समितीतील सदस्यांनी दिले. त्याचबरोबर शिवसेनेच्या सदस्यानेही सभेत सहभाग घेतला.

    स्थायी समिती सभापती नितीन लांडगे म्हणाले, आजच्या सभेत सर्वपक्षीय १६ नगरसेवक सहभागी झाले होते. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली. ४४ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता दिली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी कोणत्याही विषयाला विरोध दर्शविला नाही. पाणीपुरवठ्यावर चर्चा झाली. सणासुदीच्या काळात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. डेग्यूबाबत उपाययोजना कराव्यात, दक्षता घ्याव्यात अशा सूचनाही आयुक्तांना केल्या आहे.