कुदळवाडीतील महापालिका शाळेत आठवी ते दहावीचे वर्ग सुरु करा!

- स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांची मागणी ; महापालिका शिक्षणाधिकारी पराग मुंडे यांना निवेदन

    पिंपरी : कुदळवाडीतील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ( क्र.८९) शाळेमध्ये सध्या विद्यार्थ्यांना पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण मिळते. या पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची नाहक ससेहोलपट होत आहे. त्यामुळे महापालिका शिक्षण मंडळाने या शाळेत ८ वी ते १० वी चे वर्ग सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी केली आहे.

    याबाबत महापालिका शिक्षणाधिकारी पराग मुंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, कुदळवाडी महापालिका शाळा क्र.८९ मध्ये सद्या १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग सुरु करण्यास मान्यता आहे. परंतु ८ वी पासूनच्या पुढील शिक्षणास विद्यार्थ्यांना इतरत्र जावे लागते. कुदळवाडी भागात कामगार वर्ग, मजुर वर्ग, गोरगरीब लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी शाळेत प्रवेश घेण्याकरिता त्यांच्या पालकांना तेथील शाळेची फी भरणे शक्य नाही. तसेच या शाळेच्या ठिकाणी शाळेची इमारत पुर्णपणे तयार झालेली आहे, त्यामुळे तेथे पुढील वर्ग (८ वी ते १० वी) सुरु करणेस जागा उपलब्ध आहे.

    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करून ही मागणी पूर्ण करावी. कुदळवाडीतील विद्यार्थ्यांचा विचार करता येथे ८ वी ते १० वी चे वर्ग नव्याने निर्माण करुन पुढील वर्ग सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. अशी आमच्या संपुर्ण ग्रामस्तांची मागणी आहे, असेही दिनेश यादव यांनी म्हटले आहे.