पिंपळे निलख येथील क्रीडा संकुल, फुटबॉल टर्फ ग्राउंड आणि विरंगुळा केंद्र सुरु

महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे निलख येथील कावेरीनगर येथे ५३१० चौरस फुट आकाराचे भव्य क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. क्रीडासंकुलात कुस्तीसाठी ४०० चौरस फुटाचा लाल मातीसह भव्य हौद तयार करण्यात आला आहे. क्रीडासंकुलात व्यायामाचे साहित्य, जिम, मॅटींगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महिलांकरीता विशेष वेळ राखून ठेवण्यात आलेली असून त्याचा उपयोग भागातील महिलांना उत्तम आरोग्य राखण्यासाठी होणार आहे.

  पिंपरी : प्रभाग क्र.२६, पिंपळे निलख येथील क्रीडा संकुल, फुटबॉल टर्फ ग्राउंड आणि विरंगुळा केंद्राचे उद्घाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे म्हणालया की, शहरातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी महापालिका चांगल्या सुविधा उपलब्ध करून देत आहे. या खेळाडूंनी जागतिक पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करुन पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घालावी अशी अपेक्षा महापौर यांनी व्यक्त केली.

  यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, नगरसदस्या ममता गायकवाड, आरती चौंधे, माजी नगरसदस्य विनायक गायकवाड, कार्यकारी अभियंता विलास देसले, उप अभियंता संध्या वाघ, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, खेळाडू, विद्यार्थी आदींसह नागरिक उपस्थित होते.

  महापौर माई ढोरे म्हणाल्या, शहर स्मार्ट सिटीकडे झेप घेत आहे. अशावेळी शहरातील जडणघडण, परंपरा आणि संस्कृती चांगल्या प्रकारे वृद्धींगत व्हावी यासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन आवश्यक आहे. विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी सुसंवाद, विविध मनोरंजनात्मक बाबींमधून आपले आरोग्य उत्तम राखावे. त्याचप्रमाणे नवोदितांना आपल्या अनुभवाने मार्गदर्शन करत रहावे. त्यामुळे या शहराचे सामाजिक आरोग्य अधिक बळकट होण्यास मदत होईल.

  सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, या भागात ज्येष्ठ नागरिक, पोलिस कर्मचारी, खेळाडू, विद्यार्थी असे सर्व प्रकारचे नागरिक राहत असून त्यांच्यात उर्जा, चैतन्य आणि आरोग्य जोपासण्याचे काम या विरंगुळा केंद्र, क्रीडा संकुलामुळे होईल. आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेल्या मार्गदर्शनातून, त्यांच्या संकल्पनेतून या विरंगुळा केंद्राची निर्मिती केली आहे. त्यांनी ज्येष्ठ नागरिक, खेळाडू आणि नागरिकांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत, असे सांगून पक्षनेते ढाके यांनी उपस्थितांना कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मास्क वापरणे, गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

  महानगरपालिकेच्या वतीने पिंपळे निलख येथील कावेरीनगर येथे ५३१० चौरस फुट आकाराचे भव्य क्रीडासंकुल उभारण्यात आले आहे. क्रीडासंकुलात कुस्तीसाठी ४०० चौरस फुटाचा लाल मातीसह भव्य हौद तयार करण्यात आला आहे. क्रीडासंकुलात व्यायामाचे साहित्य, जिम, मॅटींगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच महिलांकरीता विशेष वेळ राखून ठेवण्यात आलेली असून त्याचा उपयोग भागातील महिलांना उत्तम आरोग्य राखण्यासाठी होणार आहे. क्रीडासंकुलाच्या शेजारी ६१८० चौरस फुट आकाराचे फुटबॉल टर्फ ग्राउंड तयार करण्यात आलेले असून त्यामध्ये खेळाडूंसाठी आधुनिक पद्धतीचा टर्फबेस तयार करण्यात आलेला आहे.

  महानगरपालिकेच्या वतीने वेणूनगर परिसरात विरंगुळा केंद्र उभारण्यात आलेले असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी १२५० चौरस फुटाचे गजेबो आणि २६७ चौरस फुटाचे स्टेज तयार करण्यात आलेले आहे. नागरिकांसाठी सिंथेटिक फ्लोरिंगचा पाथवे तयार करण्यात आला असून त्याचा उपयोग या भागातील रहिवाशांना होणार आहे. मुलांकरीता ७२४ चौरस फुटाचे सिंथेटिक फ्लोरिंगचे चिर्ल्ड्रन पार्क तर नागरिकांसाठी २४२ चौरस फुटाची ओपन जिम तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी केले. तर आभार ज्येष्ठ नागरिक अशोक पिंगळे यांनी मानले.