पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विकास आराखडा करण्याचा अधिकार राज्यालाच – उपमुख्यमंत्री अजित पवार

गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने PMRDA कडे दिला असताना भाजप मात्र या गावांचा विकास आराखडा महापालिकाच करेल यावर ठाम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील राजकारण तापलंय.

    पुणे: पुणे महापालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या या २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचा अधिकार राज्य सरकारला असेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ गावांच्या विकास आराखड्यावरुन राज्य सरकार आणि पुणे महापालिका आमने-सामनेआल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. हा आराखडा कोणी तयार करायचा याबाबत दोन मतप्रवाह आहेत हे खरयं पण लोकशाही मार्गाने सर्वांना विरोध करण्याचा अधिकार असल्याचेही ते म्हणाले आहे.

    विकास आराखड्याचा वाद
    पुण्यालगत असणाऱ्या २३ गावांचा समावेश काही दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेत करण्यात आला आहे. परंतु आता या गावाचा विकास आराखडा तयार करण्यावरून राज्यसरकार आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजप यांच्यात संघर्ष सुरू झाला. या गावांचा विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी राज्य सरकारने PMRDA कडे दिला असताना भाजप मात्र या गावांचा विकास आराखडा महापालिकाच करेल यावर ठाम आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील राजकारण तापलंय.

    या गावांचा झाला महानगरपालिका हद्दीत समावेश
    महालुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोली, कोंढवा धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, होळकरवाडी, औताडे हांडेवाडी, वडाचीवाडी, शेवळेवाडी, नंदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिरालेवाडी, गुजरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, वाघोली या २३ गावांचा पुणे महापालिकेच्या हद्दी समावेश झाला आहे.