कोरेगाव भीमातील कंपनीतून जनरेटरच्या बॅटऱ्या आणि तांब्याच्या महागड्या केबल चोरीला

    शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पॅकोलाईन इंडस्ट्रिज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील जनरेटरच्या बॅटऱ्या व तांब्याच्या महागड्या केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील पॅकोलाईन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मोकळ्या जागेमध्ये कंपनीचे मोठे जनरेटर आहे. बुधवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास या कंपनीतील जनरेटर चालू करण्यासाठी कंपनीतील काही कामगार गेले असता जनरेटर चालूच झाला नाही. त्यामुळे त्यांनी पाहणी केली असता जनरेटरमधील तीन मोठ्या बॅटऱ्या व तांब्याच्या महागड्या केबल असा तब्बल सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे निदर्शनास आले.
    याबाबत पॅकोलाईन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मॅनेजर राजीव रविकुमार नायर (वय ४४ वर्षे रा. तुकारामनगर खराडी, चंदननगर, पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हे दाखल केले असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.