कोरोना साधन सामग्री पुरविताना भेदाभेद थांबवा ,अन्यथा उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन ; भाजप नेते दिलीप खैरे यांचा इशारा

कोरोना आजाराबाबत जनतेत निर्माण झालेली भीती, तपासणी केंद्रांची मर्यादित संख्या, तपासणी केल्यावर अहवाल मिळण्यासाठी होणारा विलंब, ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरनाची गैरसोय यातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व वेगाने होत आहे. जी काही आरोग्य यंत्रणा आहे ,त्यावर सध्या प्रचंड ताण आहे. तर दुसर्‍या बाजूला सर्वसामान्य रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन असेल किंवा प्राथमिक उपचारातील फॅबी फ्लू गोळ्या किंवा पोस्ट कोड मधील इतर औषधे रुग्णांना वेळेवर मिळत नाहीत.

    बारामती: बारामती शहर व तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असून रुग्णांना वेळेवर औषधे मिळत नाहीत, आरोग्य व्यवस्था पुरविताना प्रशासन राजकीय दुजाभाव करत असल्याचा आरोप भाजपचे नेते दिलीप खैरे यांनी केला असून हा दुजाभाव न थांबल्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

    याबाबतचे निवेदन दिलीप खैरे यांनी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले आहे. याबाबत अधिक माहिती देताना खैरे म्हणाले,कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या निमित्ताने बारामती शहर व तालुक्यातील एकूण सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांच्या दरम्यान समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. मागील अनेक दिवसांपासून बारामती तालुक्यातील कोविड रुग्ण संख्या साडे तीनशेच्या आसपास राहत आलेली आहे, त्यातही बारामती शहराच्या तुलनेत तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या संक्रमणात जनता भरडून निघत आहे.

    कोरोना आजाराबाबत जनतेत निर्माण झालेली भीती, तपासणी केंद्रांची मर्यादित संख्या, तपासणी केल्यावर अहवाल मिळण्यासाठी होणारा विलंब, ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरनाची गैरसोय यातून कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर व वेगाने होत आहे. जी काही आरोग्य यंत्रणा आहे ,त्यावर सध्या प्रचंड ताण आहे. तर दुसर्‍या बाजूला सर्वसामान्य रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन असेल किंवा प्राथमिक उपचारातील फॅबी फ्लू गोळ्या किंवा पोस्ट कोड मधील इतर औषधे रुग्णांना वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. तर अनेकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. बारामती तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती व संस्था यांच्या हाती एकवटल्या मुळे तालुक्यातील निवडक मंडळींसाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन राबवत असल्याचे चित्र दुर्दैवाने तयार झाले आहे .खरेतर ही राजकारण करण्याची वेळ नाही, अथवा आरोग्यव्यवस्था पुरवताना दुजाभाव करण्याची ही वेळ नाही. परंतु ज्या पद्धतीने आरोग्य व्यवस्था व प्रशासनाचे केवळ शहरात तेही काही ठराविक व्यक्ती पदाधिकाऱ्यांच्या हाती केंद्रीकरण झाले आहे. ते पाहता तालुक्यातील ग्रामीण भागातील व शहरातील सर्वसामान्यांना कोणी वाली नसल्याचे विदारक चित्र आहे.

    बारामती तालुक्यातील महामारीच्या उपाययोजनांबाबत प्रसारित होणारी माहिती, खर्चाचे आकडे, प्रत्यक्ष रुग्णांना मिळणारी मदत यात खूप मोठी तफावत आहे. यासाठी महत्वाच्य मागण्या करीत आहोत,यामध्ये रेमडीसेविर औषधांचा रुग्ण संख्येचे नुसार न्याय पुरवठा करावा,खाजगी हॉस्पिटल मधील रुग्णांच्या बिलांचे ऑडिट व्हावे, प्रत्येक सर्कलमध्ये कोविड तपासणी केंद्र सुरू करावीत, कोरोणा उपचारातील साधनसामग्री पुरविताना शहर – ग्रामीण, गरीब – श्रीमंत असा दुजाभाव त्वरित थांबवावा,यासह कोरोना संदर्भातील आरोग्य विभाग व प्रशासकिय यंत्रणातील मेळ घालून तातडीने सुधारणा व्हावी, अन्यथा नाईलाजाने आम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून धरणे, अथवा उपोषण यासारखे आंदोलन करावे लागेल ,त्यासाठी कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही,असा इशारा खैरे यांनी दिला ‌आहे.