नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार

पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांचा इशारा

मंचर : कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर गणेश मंडळांनी नेहमीप्रमाणे मोठ्या धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा न करता चार फुटाच्या आतील गणेशमुर्तींची प्रतिष्ठा करावी.मुस्लिम सण आणि हिंदू सणाला दोन्ही धर्माच्या नागरिकांनी एकमेकाला सहकार्य करुन सण साजरा करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,असा इशारा पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी दिला.

एकलहरे येथे आयोजित गणेश मंडळे आणि मुस्लिम समाज बैठकीत पोलिस अधिक्षक संदिप पाटील बोलत होते. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरिक्षक कृष्णदेव खराडे, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, ज्येष्ठ पत्रकार डी.के.वळसे पाटील, मंचर शहर तंटामुक्तीचे अध्यक्ष युवराज बाणखेले, उद्योजक गोविंद खिलारी, रमेश कानडे, राजु इनामदार, अल्लु इनामदार, नितीन भालेराव, डॉ.मंगेश बाणखेले, संतोष खामकर आदी उपस्थित होते. पोलिस अधिक्षक संदिप पाटील म्हणाले की, मोहरम आणि गणेशोत्सव सण अतिशय साध्या पद्धतीने साजरे करावेत. गणेश मुर्तींचे विसर्जन आणि स्थापना याची कुठल्याही प्रकारची मिरवणुक काढु नये.नागरिकांनी गर्दी करु नये. गणेश उत्सवात आरतीसाठी गर्दी न करता पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र न येता गणपतीची आरती करावी. मिळालेल्या देणग्यांमधुन कोरोनाविषयक सामाजिक उपक्रम राबवावेत,अशी सूचना पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी उपस्थितांना केल्या.