माजी सरपंच जयदिप तावरेंच्या अटकेच्या निषेधार्थ माळेगावात कडकडीत बंद

    बारामती : राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना केलेल्या अटकेच्या निषेधार्थ माळेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी अनेक ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून जयदिप तावरे यांच्या अटकेचा निषेध करुन जयदीप यांच्यावर दाखल झालेला गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.

    रविराज तावरे यांनी आपल्यावरील गोळीबार प्रकरणी तावरे यांचे नाव घेतल्याने पोलिसांनी तावरे यांना अटक केली. तावरे यांच्यावर राजकीय आकसापोटी खोटी फिर्याद दाखल केली ‌असल्याचा आरोप करून अनेक ग्रामस्थांनी गुरुवारी (दि. ८) माळेगाव एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी तावरे यांच्या समर्थकांनी माळेगाव बंदसह निषेध सभा आयोजित करण्यात आली होती.

    शिवाजी चौकात निषेध सभा झाली. यावेळी संतोष जगताप, दादा जराड, राजेंद्र तावरे, दिलीप तावरे, रुक्मिणी लोणकर आदींनी मनोगत व्यक्त करुन दाखल झालेल्या फिर्यादीचा निषेध करत जयदीप तावरे यांच्यावरील चुकिचे गुन्हे माफ करून सोडण्याची मागणी केली. यावेळी दत्तात्रय येळे, दिपक तावरे, बंटी तावरे, प्रदिप तावरे, शिवराज राजेजाधवराव यांच्यासह पणदरे, धुमाळवाडी, निरावागज येथील युवक सहभागी झाले होते.

    दरम्यान, या निषेध सभेत हजारो युवक उपस्थित होते. जयदीप तावरे यांचे सर्व कुटुंब महिलांसह उपस्थित होते. यावेळी जयदीप तावरे नावाच्या टोप्या परिधान केलेले युवक, मी जयदीप तावरे, मला अटक करा असे बॅनर लक्ष वेधून घेत होते. अनेक वक्त्यांनी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे व त्यांचे पती रविराज तावरे यांनी पदाचा वापर करून गैरव्यवहार केल्याचा आरोप केला.