महापालिका आयुक्तांच्या कार्यशैलीवर जोरदार टीका ; नगरसेवकांकडून महासभेत आयुक्तांचा धिक्कार

महापालिकेनेही पुढचा मागचा विचार न करता सव्वा तीन कोटी रुपये दिले. त्याच्या चौकशीचे काय झाले. अहवालाचे काय झाले. मागची बीले कोणाच्या खात्यातून गेली हे कळले पाहिजे'. स्पर्श संस्थेचा अहवाल सादर का केला नाही. पटलावर का मांडला नाही, असा सवाल राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांनी उपस्थित केला.

    पिंपरी: ओरिसा केडरचे सनदी अधिकारी असलेल्या आयुक्त राजेश पाटील यांना अडिच महिने उलटूनही पिंपरी – चिंचवडकर महापालिका आयुक्तपदी छाप पाडता आलली नाही. आयुक्त दालनात बसून बैठका घेणाऱ्या, स्वत:च्याच कोषात मग्न असणाNया राजेश पाटलांवर महासभेत जोरदार टीका झाली. कोट्यवधी रुपयांची कंत्राटे थेट पद्धतीने देणाऱ्या स्पर्श संस्थेला पाठिशी घालणाऱ्या आयुक्तांवर गंभीर आरोप करण्यात आले. कोरोना महामारीत ‘फ्लॉप’ ठरलेल्या आयुक्तांवर आरोपांच्या फैरी झाडत त्यांचा धिक्कारही करण्यात आला. नगरसेवक, पत्रकारांना भेटण्यासाठी ताटकळत ठेवणारे आयुक्त कोणाकोणाला भेटतात, हे सांगायला नको अशी शेरेबाजीही नगरसेवकांनी केली.

    भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका सीमा सावळे म्हणाल्या, आयुक्तांनी नगरसेवकांना मुर्ख समजून स्पर्श संस्थेच्या चौकशीचा अहवाल सभागृह पटलावर ठेवला नाही. आयुक्तांनी महापौरांच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. आयुक्तांनी महापौरांचा आदेश डावलून राज्यघटनेचा अनादर केला. त्यांचा मी धिक्कार करते. इमानदार अधिकारी असल्याचे कृतीतून दिसले पाहिजे. नगरसेवक, पत्रकारांना भेटण्यासाठी ताटकळत ठेवणारे आयुक्त कोणाकोणाला भेटतात आणि कोणाला नाही हे संशयास्पद आहे. शिवसेना नगरसेवक अ‍ॅड.सचिन भोसले म्हणाले, कोरोना महामारीतही आयुक्तांकडून थेट पद्धतीने कामे दिली जात आहेत. भोसरी, जिजामाता, आकुर्डी अणि थेरगाव या चार रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येणार आहेत. या मेडिकल ऑक्सिजन जनरेटर प्लांटचे६ कोटी १० लाख रुपयांचे कंत्राट थेट पद्धतीने का दिले ? त्यासाठी ठेकेदारांना ५० टक्के आगाऊ रक्कम म्हणजेच तीन कोटी ५ लाख रुपयांची रक्कम बिनव्याजी का दिली ? असा सवाल त्यांनी विचारला.

    एकाही रुग्णावर उपचार केले नसताना स्पर्श संस्थेने महापालिकेकडे ५ कोटी १४ लाख रुपयांची बिले सादर केली. महापालिकेनेही पुढचा मागचा विचार न करता सव्वा तीन कोटी रुपये दिले. त्याच्या चौकशीचे काय झाले. अहवालाचे काय झाले. मागची बीले कोणाच्या खात्यातून गेली हे कळले पाहिजे’. स्पर्श संस्थेचा अहवाल सादर का केला नाही. पटलावर का मांडला नाही, असा सवाल राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणे यांनी उपस्थित केला.

    पिंपरी – चिंचवड महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा महापौर उषा ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या महासभेत आयुक्तांच्या वादग्रस्त कार्यशैलीवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला.