विद्यार्थीच म्हणतायत परीक्षा नको! MPSC पुढे ढकलण्याचे सरकारला साकडे

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने 14 मार्च 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र ही पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन केले. मात्र आता हेच विद्यार्थी 11 एप्रिलची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत.

    पुणे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमपीएससीने 14 मार्च 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र ही पूर्व परीक्षा पुढे ढकलू नये यासाठी आंदोलन केले. मात्र आता हेच विद्यार्थी 11 एप्रिलची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करीत आहेत.

    अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली असून, काहीजण दुखणे अंगावर काढत आहेत. गेल्या महिन्यातील स्थिती वेगळी होती. आताची स्थिती वेगळी आहे. त्यामुळे परीक्षा झाल्यास कोरोनाचा उद्रेक वाढेल अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून येत आहे.

    एमपीएससीने 14 मार्च 2021 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णया विरोधात परिक्षार्थींनी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन केले. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपला निर्णय बदलत 21 मार्चला परीक्षा घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील परीक्षा नियोजित वेळेत होतील असे स्पष्ट केले.

    एमपीएससीची 21 मार्चची परीक्षा वेळेत झाली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने येत्या 11 एप्रिलला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थी करीत आहेत. त्यातच पुण्यात एमपीएससीची तयारी करीत असलेल्या वैभव शितोळे या तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या नंतर परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीला आणखी जोर आला आहे.

    पुण्यात करोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक विद्यार्थी करोनाबाधित आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असं आयोगानेच्या स्पष्ट केले आहे.