स्टंटबाजी करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज द्यावी; नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन

टाटा मोटर्स ही कंपनी पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण आहे. शहराच्या झालेल्या प्रगतीमध्ये नक्कीच कंपनीचा मोठा वाटा आहे. 'टाटा मोटर्स' या जगविख्यात कंपनीवर कारवाई करताना प्रसिद्धीसाठी स्टंट करणाऱ्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपा नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी केली आहे.

    पिंपरी : टाटा मोटर्स ही कंपनी पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण आहे. शहराच्या झालेल्या प्रगतीमध्ये नक्कीच कंपनीचा मोठा वाटा आहे. ‘टाटा मोटर्स’ या जगविख्यात कंपनीवर कारवाई करताना प्रसिद्धीसाठी स्टंट करणाऱ्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या अधिकाऱ्यांना समज द्यावी, अशी मागणी सत्ताधारी भाजपा नगरसेविका सारिका बो-हाडे यांनी केली आहे.

    याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात नगरसेविका बो-हाडे यांनी म्हटले आहे की, दोन दिवसांपूर्वी टाटा मोटर्स कंपनीला पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभागाने नोटीस बजावली. त्यामुळे टाटा मोटर्स, पिंपरी-चिंचवड महापालिका, शहराची प्रतिमा राष्ट्रीय स्तरावर मलीन झाली. टाटा मोटर्स ही कंपनी पिंपरी-चिंचवड शहराचे भूषण आहे. शहराच्या झालेल्या प्रगतीमध्ये कंपनीचा मोठा वाटा आहे. या कंपनीमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. तसेच, शेकडो लघु उद्योग अवलंबून आहेत. उद्योगनगरी असलेल्या शहराचा कणा ही टाटा मोटर्स आहे. त्यामुळे कंपनीची अशाप्रकारे कोणतीही माहिती स्वरूपात देताना संबंधित अधिकाऱ्यांनी तारतम्य बाळगणे गरजेचे होते.

    कर संकलन विभागाकडून केलेली कारवाई ही रास्त असेलही, पण प्रसिद्धीमाध्यमांना माहिती देऊन पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या प्रसिद्धीची स्टंटबाजी करू नये. यामुळे कंपनी व्यवस्थापन आणि कामगार वर्गामध्ये महापालिका प्रशासनाबाबत नकारात्मक संदेश जात आहे. त्यामुळे टाटा मोटर्स सह शहराचे भूषण असलेल्या अनेक संस्थांवर कारवाई करताना अधिकाऱ्यांनी समंजसपणा दाखवला पाहिजे. पिंपरी-चिंचवडमधील उद्योगक्षेत्राची भावना लक्षात घेवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य ती समज द्यावी, असेही नगरसेविका बोऱ्हाडे यांनी म्हटले आहे.

    नगरसेविका बोऱ्हाडे म्हणाल्या की, टाटा मोटर्स कंपनीची माजी कर्मचारी म्हणून माझी ही भूमिका मांडली आहे. मी कंपनीच्या मानव संसाधन विकास विभागात काम केले आहे. कंपनीच्या वतीने शहरासाठी भरीव कामगिरी करण्याचे काम झालेले आहे. टाटा समुहाने कायम सामाजिक बांधिलकी जपली आहे. जगभारात सर्वाधिक दान करणारे कुटुंब म्हणून नुकताच टाटांचा गौरवही झाला आहे. कोरोना काळात टाटा मोटर्स कंपनीच्या वतीने जगभरात मदत करण्यात आली. शहराच्या विकासात कंपनीचे योगदान आहे. त्यामुळे या कंपनीची माजी कर्मचारी असल्याचा मला अभिमान आहे. अशीच भावना शेकडो कामगार, उद्योजकांची आहे, अशा कंपणीबाबत कारवाईची स्टंट करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न अधिकारी करीत असतील, तर त्याची खंत वाटते.