नदीत पडलेल्या वृद्ध महिलेला वाचविण्यात पोलिसांना यश

    आळंदी : येथील इंद्रायणी नदी घाटावर पाय धुणारी वृद्ध महिला पाय घसरून नदीत पडली. तसेच पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जावू लागली.  दरम्यान, या बाबतची खबर  मिळताच आळंदी पोलिसांनी नागरिकांच्या  मदतीने पाण्यात वाहत असलेल्या महिलेस आळंदी स्मशानभूमीजवळ पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

    हौसाबाई शहाजी खांदवे (वय ६५, रा. लोहगाव, ता. हवेली) असे या महिलेचे नाव आहे. आळंदी पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार आर. एम. लोणकर आणि के. सी. गर्जे आळंदीत पेट्रोलिंग करीत असताना इंद्रायणी नदी घाटावर नदी पात्रातील पाण्यात एक वृद्ध भाविक महिला पाय घसरून पडल्याने पाण्यात वाहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावर त्यांनी  तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेथे उपस्थित स्थानिक रहिवासी श्यामा वाटणे, अशोक शिंदे यांच्या  मदतीने पोलिसांनी  वृद्ध महिलेस वाहत्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढत महिलेचा जीव वाचविला.

    महिलेला सुखरूप घरी पोहोच

    पोलिसांनी महिलेच्या मुलाला संपर्क साधून लोहगाव येथील त्यांच्या  कुटुंबियांकडे सुखरूप पोहोच केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी दिली. या घटनेत वृद्ध महिलेचा जीव वाचविल्याबद्दल आळंदी पोलिस व नागरिकांचे परिसरातून  कौतुक केले जात आहे.