बारामती शहरात अचानक लॉकडाऊन ; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय दिनांक ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद

-अचानक निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

  बारामती : बारामती शहरात आज (दि ६ )सकाळी दहा वाजल्यापासून प्रशासनाने अचानक लॉकडाऊन जाहीर करून सर्व दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांना अनपेक्षित धक्का बसला. राज्य शासनाने काढलेल्या आदेशानुसार हा लॉकडाउन दिनांक ३० एप्रिल पर्यंत करण्यात आला असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. मात्र व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता, तसेच पूर्वकल्पना न देता अचानक लॉकडॉऊन चा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

  बारामती शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने तीन दिवसापूर्वी सायंकाळी सहा ते सकाळी नऊ पर्यंत बारामती शहर व तालुक्यात संचार बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाची अंमलबजावणी बारामती शहरात काटेकोरपणे केली जात होती. आज मंगळवार दिनांक सहा रोजी नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली. मात्र काही वेळातच पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी आले. बारामती शहरात आज पासून दिनांक ३० एप्रिल पर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आला असून याबाबतचे आदेश देण्यात आले असल्याने सर्वांनी दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन व्यापाऱ्यांना करण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांनी आम्हाला याबाबत अगोदर पूर्वकल्पना देण्याची आवश्यकता होती, हा निर्णय घेताना व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे, तसे न करता अचानक हा निर्णय घेणे बरोबर नसल्याची खंत व्यापाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना बोलून दाखविली. काही वेळातच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने व्यवसाय बंद करण्यात आले. चक्क महिनाभर हा लॉक डाऊन राहणार असल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षीच्या लॉकडॉऊन मुळे अनेक व्यवसाय मोडकळीस आले आहेत, त्यात हा लॉकडाउन करण्यात आल्याने आणखी मोठे अरिष्ट व्यवसायांवर कोसळणार आहे, त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा, एक नागरिकांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. गुढीपाडवा हा सण एक आठवड्यावर आलेला आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केलेला आहे. मात्र लोक डाऊन मुळे व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे .

  “प्रशासनाने दिनांक ३० एप्रिल पर्यंत लोक डाऊन चा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. अगोदरच गेल्या वर्षीच्या लोक डाऊन मुळे व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत आलेला आहे. दिनांक ३० एप्रिल पर्यंत लोक डॉन चा घेतलेला निर्णय व्यापाऱ्यांसह सर्वसामान्यांच्या रोजीरोटीवर परिणाम करणार आहे. हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतले नाही. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने आठ दिवसाच्या अंतराने लॉक डाऊन करण्याची गरज आहे, मात्र तसे न करता सलग तीस तारखेपर्यंत बंदीचा निर्णय घेऊन व्यापारी वर्गासह सर्वसामान्यांची मोठी अडचण निर्माण झाले आहे, व्यापारी वर्गाचा विरोध आहे.”
  -नरेंद्र गुजराथी , अध्यक्ष बारामती व्यापारी महासंघ.

  राज्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे, त्यामुळे राज्य शासनाने सोमवारी(दि ५) दिनांक ३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन करण्याबाबतचे आदेश आमच्याकडे प्राप्त झाले आहेत. सोमवारी रात्री उशिरा आदेश प्राप्त झाला. उशिरा आदेश मिळाल्याने याबाबतची माहिती व्यापाऱ्यांना देता आले नाही. मंगळवारी सकाळी याबाबत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आले आहे. व्यापाऱ्यांसह नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे.

  -दादासाहेब कांबळे , प्रांताधिकारी, बारामती.