बँकेतील  डेटा चोरी प्रकरणी सुधीर भटेवरा अटकेत ;   २४ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी

सुधीर शांतीलाल भटेवरा (वय ५४, रा. एम्पायर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

    पुणे: नामांकित बँकेमधील बंद खात्याचा डेटा चोरी प्रकरणात सायबर पोलिसांनी पळून गेलेल्या सुधीर भटेवरा याला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. सुधीर शांतीलाल भटेवरा (वय ५४, रा. एम्पायर सोसायटी, आनंदनगर, सिंहगड रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. अनघा मोडक तसेच औरंगाबाद येथील राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू हे सुधीर भटेवरा याच्या घरी १५ मार्च रोजी रात्री आले होते. शर्मा आणि संधू यांच्यासाठी भटेवरा याने २५ लाख रुपयांची सोय केली होती.

    पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन २५ लाख रुपये जप्त केले होते. या वेळी भटेवरा याला चौकशीसाठी बोलावल्यास हजर राहण्याची ४१ नुसार नोटीस दिली होती. मात्र, तो पळून गेला होता. त्यामुळे सायबर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी भटेवरा याच्याबरोबर इतर १३ आरोपींना न्यायालयात हजर केले होते. सरकारी वकील अ‍ॅड. ज्ञानेश्वर मोरे यांनी सांगितले, भटेवरा याच्याकडून २५ लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. ते त्याने कोणाकडून आणले. त्याच्या मोबदल्यात त्याला इतर आरोपींकडून कोणता डेटा मिळणार होता.

    राजेश शर्मा आणि परमजितसिंग संधू यांच्याशी त्याचा संपर्क कसा झाला, त्यांना मिळालेल्या बँक खात्यांचा डेटाचा ते पैसे काढण्यासाठी कसा उपयोग करणार होते, याचा तपास करायचा असल्याचे सांगितले. त्यानंतर न्यायालयाने भटेवरा याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. त्याचबरोबर अन्य १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली.