कोरोनाविरोधी उपाययोजनांबाबत जिल्हा  प्रशासनाने मांजरी खुर्द ग्रामपंचायतीला केल्या सूचना

-जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची मांजरी खुर्द गावाला भेट वाघोली : (ता. हवेली) मांजरी खुर्द (ता. हवेली) प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यांनतर कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी

-जि. प. उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची मांजरी खुर्द गावाला भेट

वाघोली : (ता. हवेली) मांजरी खुर्द (ता. हवेली) प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यांनतर  कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पुणे जिल्हापरिषदचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी आज दि. १४ मे रोजी मांजरी खुर्दला भेट देत येथील ग्रामपंचायत प्रशासनासोबत  बैठक घेतली. बैठकीमध्ये संदीप कोहिनकर यांनी विविध उपाययोजनांबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

ग्रामपंचायत मांजरी खुर्द येथे दि. ३० एप्रिल  रोजी पहिला व दि. ८ मे  रोजी तिसरा कोरोना रूग्ण आढळला. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार,  कोरोना रुग्ण सापडलेल्या दिवसापासून २८ दिवस गावचा ३ किमीच्या आजूबाजूचा परिसर कोरोनाबाधीत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच ५ किमीचा परिसर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गावात संचारबंदीचा नियम लागू झालेला असून  गावातून कोणत्याही व्यक्तिला बाहेर जाता येणार नाही. तसेच कोणत्याही बाहेरच्या व्यक्तींना गावात प्रवेश दिला जाणार नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिग हा एकमेव उपाय असल्यामुळे स्वयंफूर्तीने गाव शंभर टक्के बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने (मेडीकल व दवाखाने वगळता) २१ मे पर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहेत. नागरिकांना अत्यावश्यक सेवा स्वयंसेवकांमार्फत घरपोच सेवा पुरविण्यात पुरवण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. नागरिकांना अत्यावश्यक घरपोच देण्यासाठी गावात वॉरीयर्स (स्वयंसेवक) कार्यरत राहणार आहेत.

सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वेक्षणात संशयित वाटणाऱ्या रुग्णाची प्लस ऑक्सिमिटरद्वारे तपासणी करण्यासाठी ऑक्सिमिटर किट उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांजरी खुर्द ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गावामध्ये अशा वर्कर्स, शिक्षक आरोग्य केंद्राचे कर्मचारी यांच्या माध्यमातून सर्वे करणे, गावाला जोडणाऱ्या तीन रस्त्यांवर चेकपोस्ट लावणे, चेक पोस्टच्या ठिकाणी सॅनीटायजर स्प्रे करणे, गावामध्ये नव्याने येणाऱ्या लोकांना १४ दिवस होम क्वारंटीन करणे आदि निर्णय घेण्यात आले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बैठकीला उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, वैद्यकीय अधिकारी डॉ वर्षा गायकवाड, ग्रामसेवक आर. एस. कदम, सरपंच प्रतिमा उंद्रे, विकास उंद्रे, किशोर उंद्रे, सचिन उंद्रे, हिरामण गवळी, स्वप्नील उंद्रे, महादेव उंद्रे, समीर उंद्रे, अशोक आव्हाळे, सोमनाथ आव्हाळे आदि उपस्थित होते.