पत्नी अन तिच्या आईवडिलांच्या त्रासाला  कंटाळून जावयाची आत्महत्या

सुसाईड नोट लिहून तरुणाची आत्महत्या ; आठवड्यातील दुसरी घटना

    पुणे : संशयखोर पत्नी व तिच्या आई वडिलांच्या त्रासाला कंटाळून ३० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नांदू न देता पत्नीला हुसकावतात तसेच पत्नी आणि तिचे आई-वडील त्रास देत असल्याने आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट या तरुणाने लिहून ठेवली आहे. गेल्याच आठवड्यात देखील असाच प्रकार घडला होता. त्या तरुणाने पालकमंत्र्यांना पत्नी व तिच्या कुटुंबावर कारवाई करा त्यांना सोडू नका, अशी सुसाईड नोट लिहिली होती. त्यानंतर हे दुसरे प्रकरण घडले आहे.

    शरद नरेंद्र भोसले (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात पत्नी प्रियंका, मेव्हणा मनीष उर्फ गणेश शंकर शिंदे, तसेच मनिषचे आईवडिल (सर्व. रा. कवडीपाट,  लोणी काळभोर) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत नरेंद्र भोसले (वय ५८, रा. धनकवडी) यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१८ साली शरदचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून पत्नीचे आईवडील संसारात हस्तक्षेप करत असत. पत्नी प्रियंका ही आई वडिलांच्या सांगण्यावरून घरात कौटुंबिक कारणावरून व चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करून त्रास देत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी शरदचा मेहुणा मनीष उर्फ गणेश भांडणे मिटवण्यासाठी फिर्यादी व त्यांचा मुलगा शरदला मार्केटयार्ड परिसरात बोलावून घेतले. त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली होती. या सर्व त्रासाला कंटाळून शरदने (२८ ऑगस्ट रोजी राहत्या घरात बेडरूममधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    आत्महत्या करण्यापूर्वी शरदने सुसाईड नोट लिहिली आहे, घुहूपोलिसांना सापडली आहे. त्यात सासू सासरे बायकोला नांदू देत नाहीत, तिला भडकवतात. तसेच तिच्या व सासू सासऱ्यांचा त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे अधिक तपास करीत आहेत