संडे हो या मंडे… हर कोई खाता है अंडे..!

कोरोना काळात वधारला अंड्यांचा भाव
पिंपरी: कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतीकारशक्ती वाढविणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे ही शक्ती कशाकशाने वाढते, याची यादीच नागरिक ‘फॉलो’ करताहेत. त्यातला एक महत्वाचा जिन्नस म्हणजे अंडी. त्यात आता डॉक्टरांनीच दररोज एकतरी अंडी खावे, असा सल्ला दिल्यामुळे खवैय्यांचे चांगलेच फावले आहे. परिणामी, बाजारात अंड्यांचा भाव वधारला आहे.

कोरोना संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कोंबडी आणि अंड्यांमुळे संसर्ग वाढतो, अशा अफवांनी बाजार गरम झाला होता. परिणामी, पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले. तथापि, पोल्ट्री व्यावसायिक आणि राज्य शासनातर्फे वारंवार आवाहन करूनही ग्राहक काही फिरकत नव्हता. संक्रमणाच्या प्रारंभी त्यातही लॉकडाउनच्या कालावधीत या व्यवसायाला उतरती कळा लागली. अफवांसोबत बाजारपेठा बंद राहण्याचाही परिणाम या व्यवसायावर झाला. सद्या कोरोना संक्रमणाची गती वाढली आहे. दररोज हजारोंच्या संख्येत संक्रमित रुग्ण आढळू लागले आहेत.
उपचारादरम्यान संक्रमित रुग्णांना आहाराकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला जात आहे. त्यातही प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी दररोज एकतरी अंडे खावे, असे वैद्यकी तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. याचा अंडेविक्रीच्या व्यवसायावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या व्यवसायातील मंदी हटून अंडीविक्रीला सुगीचे दिवस आले आहेत. पाच रुपयांना मिळणारे एक अंडे आता दोन रुपयांनी महागले असून त्याची किंमत सात रुपये झाली आहे. बंद पडलेली अंडीविक्रेत्यांची दुकाने अनलॉकमध्ये पुन्हा सुरू झाली आहेत.

‘अंडी खाण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या जात आहे. त्याचबरोबर अनलॉकमध्ये व्यवसाय देखील मुक्त झाला आहे. त्याचा बराच सकारात्मक परिणाम अंडी विक्रीवर झाला आहे. किरकोळ विक्रेत्यांंकडून देखील मागणीत वाढ झाली असून कालपर्यंत असणारी ग्राहकांची प्रतिक्षा आता संपली आहे.’
– मुझ्झफर बशीर शेख, अंडी  विक्रेता, भोसरी.