सुरेश पिंगळेंची कौटुंबिक वादामुळे आत्महत्या; पुणे पोलिसांची माहिती

  पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयासमोर पेटवून घेत आत्महत्या करणाऱ्या सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्येला कौटुंबिक वादाचे देखील कारण असल्याचे पुणे पोलीसांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडे सापडलेल्या पिशवीत दोन पत्र सापडली असून, त्यात कौटुंबिक समस्या व इतर अशी १५ कारणे दिली आहेत, असा दावा पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केला आहे. त्यात पोलीसांच्या चारित्र्यपडताळणी लवकर न मिळाल्याचे एक कारण आहे. सुरेश पिंगळे यांच्या आत्महत्याबाबतची चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

  पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी याबाबत पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे. यावेळी सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, विशेष शाखेचे उपायुक्त मितेश घट्टे, परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील उपस्थित होते. शासन निर्णयानुसार तीस दिवसांच्या कालावधीत दाखला देणे बंधनकारक आहे. हे प्रकरण संवेदनशील आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.

  सुरेश विठ्ठल पिंगळे (वय ४२) यांनी बुधवारी पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यानंतर ते पेटलेल्या अवस्थेत आयुक्तालयात वाचवा-वाचवा म्हणत शिरले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी पहाटे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत दोन पत्रे पोलीसांना सापडली आहेत. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांनी कौटुंबिक वाद तसेच इतर समस्यांचा उल्लेख केला असल्याचे लिहीले आहे, असे पोलीसांनी सांगितले. त्यामुळे ते काही महिन्यांपासून तणावाखाली होते.

  नोकरी मिळवण्यासाठी त्यांना चारित्र्य पडताळणी दाखला मिळवण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, चुकीचा पत्ता दिल्याने त्यांना पुन्हा अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. पडताळणीत त्यांच्या नावाचे साम्य असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवर कोथरूड, समर्थ व सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होते. नावसाध्यर्मामुळे पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले.

  सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्देवी आहे. पिंगळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीवर गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी दाखला मिळण्यास पिंगळे यांना त्रासाला सामोरे जावे लागले. प्राथमिक चौकशीत पिंगळे यांना दाखला मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

  – दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री