ऐन पावसाळ्यात ‘जलपर्णी’ काढण्याच्या निविदांमध्ये रिंग झाल्याचा संशय ; ‘जलपर्णी काढणार की प्रवाहात लोटणार?’ पुणे महापालिका वर्तुळात चर्चा

दोन वर्षांपुर्वी महापालिकेने स्पायडर मशिनच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम केले आहे. सुमारे दीड कोटी रुपयांचे काम करूनही नेमके किती काढण्यात आला याची मोजदाद महापालिकेने जाहीर केलेली नाही. सध्या वापरात असलेल्या स्पायडर मशिनची क्षमता आणि उपयुक्तता याबाबतही वेळोवेळी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. नदीपात्रात देखिल केवळ चॅनलायजेशन करण्यात आले आहे, त्याभागात स्पायडर मशिन उतरवून गाळ काढण्यात आला आहे.

    पुणे : पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरातील नद्या आणि तलावांतील ‘जलपर्णी’ काढण्याच्या निविदा स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आल्या आहेत. विशेष असे की, नद्या आणि तलावांती जलपर्णी काढण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असून प्रथमच ‘स्पायडर’ मशिनच्या सहाय्याने जलपर्णी काढण्यात येणार असून यासाठीच्या निविदांमध्ये ‘रिंग’ करण्यात आल्याचे समोर येत आहे.

    -स्पायडर मशिनच्याच सहाय्याने काढण्यात येणार
    महापालिकेने पावसाळ्यापुर्वी शहरातील मुळा व मुठा नदीतील जलपर्णी पारंपारिक पद्धतीने अर्थात बोटी आणि दोरखंडाच्या सहाय्याने हटविण्याचे काम हाती घेतले होते. विशेष असे की याच दरम्यान ‘स्पायडर’ मशिनच्या सहाय्याने जलपर्णी काढण्याच्या दोन स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या. मुळा व मुठा नदीतील जलपर्णी काढण्यासाठीची एक कोटी रुपयांची निविदा ९. ५० टक्के कमी दराने आली आहे. तर कात्रज व पाषाण तलावातील जलपर्णी काढण्याची ५० लाख रुपयांची निविदा पॉईंट ९९ (.९९) टक्के कमी दराने आली आहे. तलावातील जलपर्णी देखिल स्पायडर मशिनच्याच सहाय्याने काढण्यात येणार असून या दोन्ही कामांसाठी सहा महिन्यांची मुदत आहे.

    -मोजदाद महापालिकेने जाहीर केलेली नाही
    माहिती अशी की, दोन वर्षांपुर्वी महापालिकेने स्पायडर मशिनच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम केले आहे. सुमारे दीड कोटी रुपयांचे काम करूनही नेमके किती काढण्यात आला याची मोजदाद महापालिकेने जाहीर केलेली नाही. सध्या वापरात असलेल्या स्पायडर मशिनची क्षमता आणि उपयुक्तता याबाबतही वेळोवेळी साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. नदीपात्रात देखिल केवळ चॅनलायजेशन करण्यात आले आहे, त्याभागात स्पायडर मशिन उतरवून गाळ काढण्यात आला आहे. अशावेळी तलावांमध्ये खोलगट भागात या मशिन कशा उतरविणार? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे. सध्या पावसाळा सुरू असून जुलैअखेरीस शहरातील तलाव ओसंडून वाहातात तर नदीही प्रवाहीत असते. अशावेळी जलपर्णी प्रवाहात वाहून जाते. कात्रज तलाव आणि रामनदीतूनही जलपर्णी प्रवाहीत होउन पुन्हा मोठ्या नद्यांमध्येच येते. त्यामुळे सहा महिन्यांची निविदा ऐन पावसाळ्यात काढण्यात आल्याने नेमके जलपर्णी काढली जाणार की प्रवाहात लोटली जाणार? असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.