खेड पोलिसांचा साशंक कारभार : वरिष्ठांनी लक्ष घालण्याची खेडवासीयांची मागणी

दर रविवारी मोबाईल चोरीनंतर अनेकजण खेड पोलीस ठाण्यात भांबवलेल्या अवस्थेत फिर्याद देण्यासाठी येतात. काहींनी सेकंड हँड मोबाईल खरेदी केले असल्याने त्यांच्याकडे पक्की पावती नसते तर काहींकडे पक्की पावती सापडत नसल्याने ईएमआय क्रमांक उपलब्ध नसतो. अशा वेळेस फक्त हरवल्याचा दाखला दिला जातो. बऱ्याच जणांचा अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो. फार कमी नागरिक एफआयआर नोंदवतात. त्यामुळे या गुन्ह्याची सरकारी आकडेवारी एकदम कमी आहे. मोबाईल चोरीचे प्रमाण दर रविवारी अंदाजे अर्धा डझनभर आहे हे कटू सत्य आहे.

  अमितकुमार टाकळकर, राजगुरुनगर : दर शुक्रवारी खेड तालुक्याचे मुख्यालय असलेल्या राजगुरुनगर येथे आठवडा बाजार गढई मैदान येथे भरायचा. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आठवडा बाजार बंद झाला. त्यामुळे दर रविवारी नेहरु चौकातील नेहमीच्या भाजी मंडईत तोबा गर्दी उसळते.  या दिवशी मोबाईल चोरीच्या घटना हमखासपणे घडत आहेत. गेले कित्येक दिवस प्रयत्न करूनही या मोबाईल चोरीस आळा घालण्यात खेड पोलीस प्रशासनाला अपयश आले आहे.

  राजगुरुनगर शहर २४ वाड्या वस्त्यांनी वेढले आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने नोकरदार वर्ग देखील येथे मोठया प्रमाणात राहतो. येथील बाजारासाठी घाटावरील संगमनेर (जि. अहमदनगर) पासून घाटाखालील खोपोली (जि. रायगड) येथील व्यापारी येत असतात. अशा या वर्दळीच्या बाजारात मोबाईल चोरांची टोळी गेल्या सहा महिन्यांपासून सक्रिय झाली आहे. पूर्वी नेहरू चौकापुरता सिमीत असणाऱ्या या रविवारच्या बाजाराची व्याप्ती आता गणेश चौक पासून आझाद चौक, नेहरू चौक, मोती चौक ते अहिल्यादेवी चौक पर्यंत वाढली आहे. विशेष म्हणजे खेड पोलिसांचे ‘बॉस’ असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी (DySP) कार्यालय हे भाजी बाजारालगत असूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने खेड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर रोष निर्माण झाला आहे.

  या बाजारात पुरुष खरेदीदार देखील मोठया प्रमाणावर जातात. भाजी अथवा वस्तू घेण्यासाठी विक्रेत्याकडे खाली वाकल्यावर शर्टाच्या खिशातून अलगदपणे मोबाईल लंपास होत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना देखील याचा फटका बसला आहे.

  दर रविवारी मोबाईल चोरीनंतर अनेकजण खेड पोलीस ठाण्यात भांबवलेल्या अवस्थेत फिर्याद देण्यासाठी येतात. काहींनी सेकंड हँड मोबाईल खरेदी केले असल्याने त्यांच्याकडे पक्की पावती नसते तर काहींकडे पक्की पावती सापडत नसल्याने ईएमआय क्रमांक उपलब्ध नसतो. अशा वेळेस फक्त हरवल्याचा दाखला दिला जातो. बऱ्याच जणांचा अदखलपात्र गुन्हा नोंदविला जातो. फार कमी नागरिक एफआयआर नोंदवतात. त्यामुळे या गुन्ह्याची सरकारी आकडेवारी एकदम कमी आहे. मोबाईल चोरीचे प्रमाण दर रविवारी अंदाजे अर्धा डझनभर आहे हे कटू सत्य आहे. खेड पोलीस ठाण्यात मोबाईल ट्रॅकरची सुविधा नाही. त्यासाठी पूर्णपणे पाषाण (पुणे) येथील ग्रामीण अधीक्षक कार्यालयावर अवलंबून रहावे लागते. आजपर्यंत चोरीस गेलेल्या  मोबाईलचे ट्रॅकिंग काढून मूळ मालकास मोबाईल परत केल्याची कार्यवाही घडली नाही.

  मोबाईल चोरीच्या बहुतांश घटना या रविवारच्या मोठ्या बाजाराच्या दिवशीच घडत असल्याने एक टोळी पध्दतशीरपणे यात सक्रिय असल्याचे समोर येत आहे. अनेकांचे महागड्या किंमतीचे मोबाईल चोरीस गेल्याने नागरिक आठवडा बाजारात खरेदीस जाण्याचे टाळत आहेत. याचा नकारात्मक परिणाम बाजाराच्या उलाढालीवर होत आहे. रविवारच्या बाजारात दररोजच्या तुलनेत स्वस्त भाजी मिळत असल्याने अनेकजण आवर्जून बाजारात हजेरी लावतात. मात्र मोबाईल चोर हे शिताफीने हात साफ करून घेत आहेत. ही सराईतपणे गुन्हे करणाऱ्यांची टोळी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी प्राधान्यक्रमाने या टोळीचा छडा लावावा अशी मागणी राजगुरुनगरवासीयांकडून होत आहे.

  खेड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर साशंकता

  खेडमध्ये गेले वर्षभर दर महिन्याला खून होत आहे. चास येथील भीषण बाललैंगिक अत्याचार घटनेची विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दखल घेऊन वरिष्ठांना विविध सूचना केल्या. यात संशयित आरोपींची नावे गुन्ह्यातून कमी करण्यासाठी मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची परिसरात चर्चा आहे. बाजारात मोबाईल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. जुगार अड्डे राजरोसपणे चालू असताना थातुरमातुर कारवाई केली जाते. सर्वत्र खुलेआम गुटखा विकला जातो. त्यामुळे दस्तुरखुद्द स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) लक्ष घालून परवा मोठा साठा पकडला. त्यामुळे बघ्याची भूमिका घेणाऱ्या खेड पोलिसांवर पुणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे कोणता जालीम उपाय करणार याकडे खेड तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.