चिमण्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ घरटे ; लॉकडाऊनच्या काळात सुभाष शेटे यांनी जोपासला आगळावेगळा छंद

पक्षांसाठी परसबागेतील प्रत्येक उंच झाडांवर त्यांना धान्य,पाणी मिळण्यासाठी लवकरच व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.लॉकडाउनच्या काळातील त्यांचा हा उपक्रम नक्कीच स्त्युत्य असा आहे.

    कवठे येमाई : कोरोनाच्या धास्तीने संपूर्ण जगात हाहाकार निर्माण केला आहे. त्याला ग्रामीण भाग ही आता अपवाद राहिला नाही. अनेक सुज्ञ नागरिक कोरोनापासून आपले व कुटुंबाचे संरक्षण व्हावे म्हणून अत्यंत दक्षता घेत घरीच थांबणे योग्य समजत असल्याने त्यांची कुटुंबे कोरोनाच्या संसर्गापासून कोसो दूर राहिल्याचे आपणास पाहावयास मिळते. शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील सुभाष शेटे यांनी घरातच थांबून बालपणीचा छंद जोपासत घरातील टाकाऊ साहित्यांपासून चिमणी व पक्षांसाठी घरटी बनवून ती त्यांच्या घरामागील परसबागेतील झाडांना आज दि. २१ झाडांवर टांगत लग्नाचा ३० वा वाढदिवस एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा केला आहे.

    मागील एक महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्शवभूमीवर शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात ग्रामपंचायत प्रशासनाला गावातील नागरिक सुरक्षित रहावेत म्हणून सातत्याने लॉकडाऊन,संचारबंदी,गावबंद ठेवावे लागत आहे.मागील १ महिन्यांपासून सुभाष शेटे हे देखील आपल्या कुटुंबासह घरीच थांबून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अगदीच अत्यावश्यक असेल तरच प्रतिबंधात्मक उपाययोजना,सूचनांचे पालन करीत ते घराबाहेर पडत आहेत. त्यामुळेच कुटुंबातील सर्वजण या महामारीच्या संसर्गापासून कोसो दूर राहिले आहेत.याच बरोबर लॉकडाऊनच्या काळात घरातील स्वच्छता,घरातील नियमित कामे सांभाळत त्यांनी आपल्या घराजवळील सुमारे सव्वातीन गुंठे परसबाग देखील पूर्णपणे स्वच्छ केली आहे. या परसबागेत मुलांनी मागील वर्षांच्या लॉकडाऊनमध्ये विविध प्रकारची झाडे लावली आहेत. त्यात
    आयर्वेदिक,कोरफड,अडुळसा,तुळस,एरंड,पेरू,चिक्कू,लिंबू,चिंच,मेहंदी,कढीपत्ता,लिंब यासह तगर,पारिजातक,चाफा अशी फुलझाडे लावत ती जगवली आहेत.

    घरामागील शेटे यांची ही परसबाग स्वच्छता झाल्याने निसर्गरम्य जागा वाटू लागली आहे. जवळच श्री महादेव मंदिर,ऐतिहासिक राजवाडा,जामा मस्जिद,श्री मारुती मंदिर,मुंजाबा मंदिर असल्याने या परिसराच्या सौंदर्यात भरच पडली आहे. शेटे यांची परसबाग याच मध्यावर असल्याने शक्यतो तिकडे कोणीही फिरकत नाही.परिणामी सायंकाळी ५ ते ७ पर्यंत कुटुंबासह श्रमदान करीत असल्याने परिसर स्वच्छता होत आहे. पण उत्तम असा शारीरिक व्यायाम ही होत असल्याचे त्यांनी सांगितले. आता आज दि. २१ ला या परसबागेत पक्षांसाठी बनविलेली घरटी ही झाडांना लावण्यात आली असून लवकरच चिमण्यांचा चिवचिवाट,किलबिल पाहावयास मिळेल असे ही ते म्हणाले. तर पक्षांसाठी परसबागेतील प्रत्येक उंच झाडांवर त्यांना धान्य,पाणी मिळण्यासाठी लवकरच व्यवस्था करणार असल्याचे त्यांनी सांगितले.लॉकडाउनच्या काळातील त्यांचा हा उपक्रम नक्कीच स्त्युत्य असा आहे.