तडीपार आरोपीने पोलिसांना केली धक्काबुक्की…

    पिंपरी : पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या आरोपीने पोलिसांना धक्काबुक्की केली. आरोपी प्रशासनाची परवानगी न घेता जिल्ह्याच्या हद्दीत आल्याने त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस गेल्यानंतर हा प्रकार घडला. निखिल उर्फ लखन बाळू आगळे (वय 21, रा. एम बी कॅम्प, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल सचिन शेजाळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड पोलिसांनी आरोपी निखिल याला डिसेंबर 2019 मध्ये दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो पुणे जिल्ह्यात आला. पुणे जिल्ह्यात येताना त्याने प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नाही.

    त्यामुळे रविवारी (दि. 25) रात्री आरोपी निखिल याच्यावर कारवाई करण्यासाठी देहूरोड पोलीस गेले. त्याला ताब्यात घेत असताना त्याने फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल सचिन शेजाळ यांची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच शिवीगाळ करून पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.