अपंग व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा; प्रहार अपंग क्रांती संघटनेची मागणी

पिंपरी - चिंचवड एसटी स्थानकात स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या महिला कर्मचारी अपंग व्यक्तींना नाहक त्रास देण्याच्या हेतूने वेगवेगळी कागदपत्रे मागतात.

    पिंपरी: स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी येणाऱ्या अपंग व्यक्तींना अपमानास्पद वागणूक देऊन त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्वरित या ठिकाणावरून बदली करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासाठी मंगळवारी (दि. २४) पिंपरी – चिंचवड शहर प्रहार अपंग क्रांती आंदोलन या संघटनेच्यावतीने एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगार स्थानक प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

    एसटीचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी ६ मार्च २०२१ रोजी परिपत्रक काढून अपंग व्यक्तींना प्रवासात सवलत मिळवण्यासाठी स्मार्ट कार्ड नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार अपंग व्यक्तींकडे युडीआयडी कार्ड आणि आधार कार्ड, आधार संलग्न असलेला मोबाईल आणि ५० रुपये असणे गरजेचे आहे. पिंपरी – चिंचवड एसटी स्थानकात स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू झाली आहे. मात्र, या ठिकाणी असणाऱ्या महिला कर्मचारी अपंग व्यक्तींना नाहक त्रास देण्याच्या हेतूने वेगवेगळी कागदपत्रे मागतात. परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून वाद निर्माण करतात. या कर्मचाऱ्यांकडून अनेक वेळा अपंग व्यक्तींना अपशब्द वापरून अपमानास्पद वागणूक दिली जाते. त्यांची अडवणूक केली जाते. वरिष्ठांकडे तक्रार गेल्यावर त्यांची नोंदणी करून घेतली जाते. अशा अनेक तक्रारी प्रहार संघटनेकडे आल्याने संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वल्लभनगर एसटी आगारप्रमुख जाधव यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. ज्ञानदेव नारखेडे, रेवणनाथ कर्डिले, धीरज नागे, रमेश पिसे, अशोक भोपळे, विद्या तांदळे, सागर सुपल, स्मिता सस्ते, शामकांत नांगरे, शिला पाटील, कमल डोईफोडे, दामोदर अवसरे, राजू विटेवर, रामू जाधव, संजय कल्याणी आदी उपस्थित होते.

    या मागणीची दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात येईल. यापुढे कोणत्याही अपंग व्यक्तीला त्रास होणार नाही. सर्व अपंगांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही आगारप्रमुख जाधव यांनी दिली.