‘पुणे मेट्रो’चे काम करताना सुरक्षिततेसाठी उपाययोजना करा : दीपक मोढवे-पाटील

  पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, सुरक्षा व वाहतूक संदर्भातील उपाययोजनांबाबत काहीसे दुर्लक्ष होत असल्यामुळे किरकोळ अपघात वाढले आहेत. याबाबत महामेट्रो प्रशासनाने सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजप वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.

  याबाबत महामेट्रो वाहतूक व सुरक्षा विभागाचे व्यवस्थापक किशोर कारंडे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील प्रवासी वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या ६ किमीच्या मार्गावर मेट्रो ट्रेनची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे. कोरोना काळात मेट्रोच्या कामात खंड पडल्यानंतर आता पुन्हा जलद गतीने काम सुरु झाले आहे. तसेच, लॉकडाऊन शिथिल झाल्याने रस्त्यांवर रहदारी पुन्हा वाढली असून, अनेक ठिकाणी ट्राफिक दिसून येत आहे.

  दापोडी ते पिंपरी दरम्यान मेट्रोचे काम सुरु असताना अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने साहित्य ठेवल्याने तसेच योग्य उपाययोजना नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. याबरोबरच काम सुरु असलेल्या काही ठिकणी सूचना फलकही लावण्यात आले नाहीत. काही ठिकाणी कामामुळे उखडलेले रस्ते दुरुस्त करण्यात आले नाहीत. पावसाळ्याच्या तोंडावर यामुळे अपघाताची शक्यता आहे.

  पुणे-मुंबई महामार्गावर रात्रीच्या वेळी अवजड वाहनेही भरधाव वेगात धावतात. मेट्रो रस्त्यावरील अनेक कामे अंतिम टप्प्यात आली आहे. खडकीतून पिंपरीकडे जात असताना नाशिक फाटा उड्डाणपुलाजवळ मेट्रो स्थानकाचे काम सुरु आहे. या कामासाठी लागणारे साहित्य, बॅरीगेट, राडारोडा, पत्रे अनेकदा रस्त्यात ठेवलेले असतात. तर काही ठिकाणी मोठे सिमेंट ब्लॉक रस्त्यात पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी चारचाकींसह अवजड वाहने या रस्त्यावरून जातात. ही वाहने रस्त्यावर पडलेल्या साहित्याला धडकल्यास मोठ्या अपघाताचा धोका आहे.

  वाहतूक पोलीस-मेट्रो प्रशासनात समन्वय हवा

  काही ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. तर काही ठिकाणी भेगा पडल्याने रस्ता खचला आहे. परिणामी, दुचाक्यांचा तोल जाऊन किरकोळ अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. दापोडी पुलापासून पिंपरीपर्यंत अनेक ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळत आहे. त्यातच पोलीस आणि मेट्रो प्रशासन यामध्ये समन्वय नसल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यामुळे खराब रस्त्याची पूर्ण लेन बंद करणे, ठिकठिकाणी रेडिअमद्वारे सूचना फलक लावणे, अपघाती रस्त्यावर सुरक्षारक्षक नेमणे, राडारोडा तसेच साहित्य रस्त्यावर न टाकता सुरक्षित ठिकाणी ठेवावे. वाहतूक पोलिसांनीही वेळोवेळी पाहणी करून याबाबत आवश्यक त्या सूचना देणे, असे अपेक्षित आहे, अशी मागणी दीपक मोढवे-पाटील यांनी केली आहे.