मोफत बेडसाठी लाख रुपये घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे पोलिस आयुक्तांना पत्र

महापौर उषा ढोरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले .त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना तक्रार अर्ज दिला आहे.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्लस्टर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाला बेड उपलब्ध करुन देण्यासाठी फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेच्या सल्लागाराने खासगी डॉक्टरांच्या मदतीने एक लाख रुपये घेतल्याचा गंभीर आरोप नगरसेवकांकडून करण्यात आला आहे. फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, असा लेखी तक्रारअर्ज महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना दिला आहे.

    चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये महापालिकेचे कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्था त्याचे संचलन करते. या हॉस्पिटलचा सर्व खर्च महापालिका करत आहे. मोफत उपचार होत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेला आयसीयू बेड देण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याचा संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला. नगरसेवक कुंदन गायकवाड, विकास डोळस यांनी या प्रकारचा भंडाफोड केला. त्यावर संतप्त झालेल्या नगरसेवकांनी त्यावर महापौर उषा ढोरे यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांना दिले .त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे.तर, महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना तक्रार अर्ज दिला आहे.

    महापालिकेच्या वतीने कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारासाठी ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. येथे मोफत उपचार केले जातात. वैद्यकीय सेवेसाठी ठेकेदारी पध्दतीने फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर ही खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली. शुक्रवारी महापालिका सभेत ऑटो क्लस्टरमध्ये सेवा करणाऱ्या फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेबाबत नगरसेवकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले. कोरोनाग्रस्त रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये फॉच्र्युन स्पर्श हेल्थ केअर संस्थेत काम करणारे सल्लागार डॉ. प्रवीण जाधव यांनी वाल्हेकरवाडीतील ‘पद्मजा हॉस्पिटल’ चे डॉ. शशांक राळे, डॉ. सचिन कसबे यांच्यासह स्वीकारल्याचा आरोप महासभेत करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. दोषींवर कठोर कारवाई करावी, असे तक्रारीत म्हटले आहे.