कोरोनाची लस घ्या अन चितळेंची भाकरवडी न्या ; लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनाचा अनोखा फंडा

आम्ही कोणत्याही एका केंद्रावर बाकरवडीची पाकिटे देणार नाही. तर वेगवेगळ्या केंद्रांवर स्वयंसेवांमार्फत पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे - इंद्रनील चितळे

    पुणे:कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून लसीकरणाची मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे. यासाठी प्रशासनाने जागृती मोहीम सुरू केली आहे. नागरिकांचा लसीकरण मोहिमेला पाठींबा मिळवण्यासाठी अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. यानुसार ‘पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स’च्या माध्यमातून अनोखी शक्कल लढविली आहे.”लस घ्या अन् बाकरवडी घरी घेऊन जा..” या संकल्पनेतून जास्तीत जास्त नागरिकांना लस घेण्यासाठी प्रतिसाद मिळावा हा उद्देश या उपक्रमापाठीमागे आहे.

     

    ”पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड रिस्पॉन्स” च्या माध्यमातून इंद्रनील चितळे यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. या माध्यमातून आठवडाभरात मिळून साधारण १५ हजार बाकरवडीची पाकिटे वाटण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिक उत्सुकतेने लस घेतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दिवसाला १ लाख लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी सर्व स्तरातून लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे, त्याचाच हा एक भाग मानला जात आहे.

    याबाबत चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे म्हणाले की,’आम्ही कोणत्याही एका केंद्रावर बाकरवडीची पाकिटे देणार नाही. तर वेगवेगळ्या केंद्रांवर स्वयंसेवांमार्फत पाकिटे दिली जाणार आहेत. केंद्र जाहीर केल्यास गर्दी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे’.