प्रेमविवाहानंतर चारित्र्याच्या संशयावरून तलाठी पतीने केला डॉक्टर पत्नीचा खून

विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.  रात्री सरला झोपेत असताना विजयकुमारने तिच्या डोक्यात हातोड्याने वर्मी घाव घातला आणि चाकूने वार केले.

    पिंपरी:  प्रेम विवाहानंतर दोन वर्षांनी तलाठी असणाऱ्या पतीने डॉक्टर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा डोक्यात हातोडा आणि चाकूने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना  उघडकीस आली आहे.

    डॉ. सरला विजय साळवे (वय ३२, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. विजयकुमार गजानन साळवे असे पसार झालेल्या पतीचे नाव आहे. डॉ. सरला या बीएएमएस असून पुण्यातील नायडू रूग्णालयात नोकरीला होत्या. तर, आरोपी विजयकुमार हा तलाठी असून जुन्नर येथे तो कार्यरत आहे. विजयकुमार आणि सरला या दोघांचा दोन वर्षांपूवी प्रेमविवाह झाला आहे.

    सरला या मुळच्या भंडारा येथील तर, विजयकुमार हा गोंदिया येथील आहे. दोघे मोशीतील बोऱ्हाडेवाडी येथे वास्तव्यास होते. विजयकुमार हा पत्नी सरला हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळे त्यांच्यात नेहमी खटके उडत होते.  रात्री सरला झोपेत असताना विजयकुमारने तिच्या डोक्यात हातोड्याने वर्मी घाव घातला आणि चाकूने वार केले. ही घटना सकाळी उघडकीस आली. आरोपी विजयकुमार घटनेनंतर पसार झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.