तळेगाव ढमढेरे बाजार समितीत उडाला नियमांचा फज्जा

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ
 शिक्रापूर  : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बाजार तसेच आदी गर्दीची ठिकाणे अनेक महिन्यांपासून बंद असताना शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा तळेगाव ढमढेरे उपबाजार देखील बंद होता. परंतु नुकताच सदर ठिकाणचा बाजार सुरु झालेला असताना येथे शासनाच्या नियमांचा अखेर फज्जा उडाला. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नागरिकांच्या जीवाशी खेळ चालला असल्याचे दिसून येत आहे.

तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा तळेगाव ढमढेरे उपबाजार नुकताच सुरु करण्यात आला असून येथे शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी शेळ्या मेंढ्या घेऊन येण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आलेले होते, त्यांनतर आज ३१ ऑगस्ट रोजी तळेगाव ढमढेरे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेळ्या मेंढ्यांचा बाजार भरविण्यात आलेला होता, बाजार समिती कडून व्यापारी व शेतकऱ्यांच्या वाहन पार्किंग साठी तसेच शेळ्या मेंढ्या साठी स्वतंत्र व्यवस्था तसेच पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छता गृहाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली होती मात्र येथे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नसल्याचे आढळून आले तसेच सदर बाजारामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन काही व्यापारी व शेतकऱ्यांनी तोंडावर रुमाल अथवा मास्कचा वापर केला असल्याचे आढळून आले आहे, येथे येणारे काही व्यापारी पुणे, मुंबई येथून येत असल्याने कोरोनाचा जास्त धोका निर्माण होण्याची शक्यता आहे, मात्र येथे झालेल्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्याला जबाबदार कोण असा सवाल देखील नागरिकांना पडला आहे, त्यामुळे येथे शासनच्या नियमांचा फज्जा उडाला असल्याचे आढळून आले आहे. तर आज सुरु करण्यात आलेल्या शेळ्या मेंढ्याच्या बाजारात ३७३ शेळ्या मेंढ्यांची आवक होऊन तब्बल साडेसहा लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती बाजार समितीचे विभाग प्रमुख अनिल भुजबळ यांनी दिली आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती तसेच काही सदस्य तळेगाव ढमढेरे गावातीलच असून काही जवळीलच गावातील असताना देखील बाजार समितीतील बाजाराची अशी दयनीय अवस्था असल्याने बाजार समिती प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

कारवाई करण्याचे आदेश दिले आहे
तळेगाव ढमढेरे येथील बाजार समिती येथे आज सुरु करण्यात आलेल्या बाजार मध्ये काही नागरिकांच्या तोंडावर मास्क नसल्याबाबतची माहिती मिळालेली असून बहार समिती कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर दंड आकारण्याच्या सूचना दिल्या असल्याच्या बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांनी सांगितले.