कोरोनाबाधित मुलांवरील उपचारासाठी ‘टास्क फोर्स’ : टास्क फोर्सच्या सूचनांनुसार महापालिका उभारत आहे यंत्रणा ;  अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

कोरोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहामध्ये  सुरू करण्यात आलेले कोव्हीड सेंटरमधील रुग्णसंख्या अत्यल्प असल्याने हे सेंटर बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी येरवडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.  

    पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याची शक्यता गृहीत धरून आरोग्य यंत्रणा व उपचारासाठी पुणे महापालिकेने बालतज्ज्ञांचा समावेश असलेली ‘टास्क फोर्स’ स्थापन केली आहे. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार लहान मुलांवरील उपचारासाठी टास्क फोर्सने केलेल्या सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.

    रुबल अग्रवाल यांनी सांगितले, की कोरोनाबाधित लहान मुलांवरील उपचारासाठी शिवाजीनगर येथील सीओईपी जंबो कोव्हिड सेंटरमध्ये ५० बेडस्, येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात २०० बेडस् आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हिड  केअर सेंटरमध्ये २०० बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने शहरातील बालरोग तज्ञांच्या संघटनेच्या माध्यमातून शहरातील लहान मुलांसाठीच्या खाजगी रुग्णालयांसोबत व तेथील डॉक्टर्ससोबतही समन्वय राखून कामकाज सुरू केले आहे. शहरातील बालरोग तज्ज्ञांचा समावेश असलेले टास्क फोर्स स्थापन करण्यात आलेे आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार लहान मुलांवरील उपचार पद्धती, औषधे यांची उपलब्धता करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत.

    जंबो रुग्णालयामध्ये मुलांवर उपचारासाठी ५ बेडस्चे आयसीयु सुरू करण्यात येणार आहे. आयसीयुसाठी येथील ५ व्हेंटीलेटर्सचे केवळ सॉफ्टवेअर बदलण्यात येणार आहे. यासोबतच तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार ऑक्सीजन मास्क व अन्य तांत्रिक बाबींची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राजीव गांधी रुग्णालयातही १५ व्हेंटीलेटर्सची सुविधा करण्यात येत आहे. सीएसआरच्या माध्यमातून अथवा थेट खरेदी करुनही हे व्हेंटीलेटर्स तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही रुबल अग्रवाल यांनी नमूद केले.

    -रुग्णसंख्या घटल्याने विश्रांतवाडीतील कोव्हीड सेंटर बंद करणार
    कोरोनाबाधितांच्या विलगीकरणासाठी विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहामध्ये  सुरू करण्यात आलेले कोव्हीड सेंटरमधील रुग्णसंख्या अत्यल्प असल्याने हे सेंटर बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी येरवडा येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोव्हीड केअर सेंटरमध्ये रुग्णांना प्रवेश देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली.  शहरातील ऍक्टीव्ह कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. आजमितीला ही संख्या १० हजारांपर्यंत कमी झाली असून बहुतांश रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. महापालिकेने सुरू केलेल्या कोविड सेंटरमधील रुग्णसंख्याही बर्‍यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे व्यवस्थापनाच्या दृष्टीने सुलभता यावी यासाठी कोविड सेंटरचे फेरनियोजन करण्यात येत आहे. सध्या महापालिकेची चार कोविड सेंटर असून याठिकाणी २ हजार १०० बेडस्ची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी जेमतेम ६०० च्या आसपास रुग्ण आहेत. विश्रांतवाडी येथील संत ज्ञानेश्‍वर वसतीगृहातील सेंटरमध्ये सध्या फक्त ४७ रुग्ण आहेत.