सायबर हल्ला प्रकरणात ‘टेक महिंद्रा’चा यू टर्न : पाच कोटींचे नुकसान न झाल्याचा दावा; महापालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे कबुली

टेक महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक (व्यापार विकास) नितीन बिहानी यांनी खुलाशा पत्रात म्हटले आहे की, सायबर हल्ल्यात ५ कोटी रुपयांचे नुकसान झालेले नाही. आम्ही पोलिसात तक्रार दिली होती आणि त्यात ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दिला होता, पण प्रत्यक्षात त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिळून निश्चित किती नुकसान झाले त्याची आम्हाला माहिती नव्हती.

  पिंपरी : पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले, असा दावा करणाऱ्या टेक महिंद्रा कंपनीने अडिच महिन्यानंतर यू टर्न घेतला आहे. पाच कोटी रुपयांचे नुकसान झालेलेच नाही, अशी कबुली टेक महिंद्रा व्यवस्थापनाने महापालिका आयुक्तांना लेखी पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे सायबर हल्ल्यामागील गूढ गडद झाले आहे.

  पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या कमकुवत यंत्रणेमुळे २६ फेब्रुवारी रोजी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या २७ सर्व्हरवर चिनी हॅकर्सकडून सायबर हल्ला झाला. रॅनसमवेअरने हल्ला करून चिनी हॅकर्सने स्मार्ट सिटी कार्यालयातील २७ सव्र्हरमधील डाटा इनक्रीप्ट करुन सुमारे पाच कोटी रुपयांचे नुकसान केले. चोरलेला डाटा पूर्वपदावर आणण्यासाठी हॅकर्सनी बिटकॉईनच्या माध्यमातून खंडणी मागितली. हा सायबर हल्ला २६ फेब्रुवारी रोजी घडला असताना तब्बल १२ दिवसानंतर टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी (वय ५५, रा. अमनोरा पार्वâ टाऊन, हडपसर) यांनी याबाबत पिंपरी – चिंचवड पोलिसांकडे फिर्याद दिली.

  सुरवातीला पोलिस तक्रार दाखल करताना, सायबर हल्ला करून माहिती चोरल्यामुळे ५ कोटींचे नुकसान झाल्याचा दावा टेक महिंद्रा कंपनीने व्यवस्थापनाने केला होता. त्यामुळे नेमका कोणता आणि किती महत्वाचा डाटा इन्क्रीप्ट झाला याची पूर्णत: माहिती गुलदस्त्यात होती. या प्रकरणात सायबर हल्लयाच्या निमित्ताने ५ कोटी रुपयांचा विमा लाटण्याचा डाव असल्याचा संशय स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी व्यक्त केला.तसेच, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांच्याकडे केली होती.

  त्यानंतर राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस बजावली. सायबर हल्ल्यामागची वस्तुस्थिती काय आहे याबाबत तीन दिवसात खुलासा करा, असे त्यांनी कंपनीला बजावले. टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपन्या क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आणि आर्सेस इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड यांनी ५ वर्षाच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशनची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटी – शर्ती त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्लयात या अटी – शर्तीचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे, अशी तंबी आयुक्त राजेश पाटील यांनी पत्राद्वारे कंपनीला दिली. त्यानंतर कंपनीने ५ मे रोजी लेखी पत्राद्वारे सविस्तर खुलासा केला आहे.

  टेक महिंद्रा कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक (व्यापार विकास) नितीन बिहानी यांनी खुलाशा पत्रात म्हटले आहे की, सायबर हल्ल्यात ५ कोटी रुपयांचे नुकसान झालेले नाही. आम्ही पोलिसात तक्रार दिली होती आणि त्यात ५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दिला होता, पण प्रत्यक्षात त्यावेळी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे मिळून निश्चित किती नुकसान झाले त्याची आम्हाला माहिती नव्हती. पोलिस तक्रारीत ५ कोटी रुपयांचा अंदाज दिला होता, पण नुकसान किती झाले याचा निश्चित तपास केला असता फक्त २७ सर्व्हरवर परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

  ''पिंपरी - चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पावर झालेल्या सायबर हल्ला प्रकरणात टेक महिंद्रा कंपनीने आपले पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत केला आहे. मात्र, नुकसान नेमके कसे झाले त्याबाबत समाधानकारक खुलासा कंपनीला करता आलेला नाही. त्यामुळे नुकसानीचे पाच कोटी रुपये दाखवून टेक महिंद्रा कंपनी विमा लाटण्याचा डाव रचत आहे''.

  - सीमा सावळे, स्थायी समिती माजी सभापती

  ”रॅनसमवेअरने हल्ला करून स्मार्ट सिटी कार्यालयातील २७ सव्र्हरमधील डाटा इनक्रीप्ट केला आहे. चोरी केलेला डेटा परत मिळवला जाऊ शकतो. त्याअनुषंगाने इनक्रीप्ट झालेल्या फाईलचा अभ्यास करण्यासाठी तज्ञांची मते जाणून घेतली जात आहेत. प्रथमदर्शनी हॅकर्सचा आयपी अ‍ॅड्रेस चिनचा दिसून येत असल्याने त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. मात्र, या सायबर हल्ल्यात नेमके किती नुकसान झाले, हे संबंधित कंपनीचं सांगू शकते.”
  – संजय तुंगार (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – सायबर सेल)