मावळ तालुक्यातील तुंग भूस्खलनाची तहसीलदार बर्गे यांच्याकडून पाहणी

  वडगाव मावळ : मावळ तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी दरड कोसळून भूस्खलन झाले. या दुर्घटनेची मावळ तहसीलदार मधुसुदन बर्गे यांनी पाहणी करून संबंधित तलाठी ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.
  तुंग गावचे रहिवासी सीताराम पठारे यांचे घर व किराणा दुकान जवळच १०० मीटर अंतरावर आहे. सकाळी घरातील सर्व माणसे भात लावणीसाठी शेतात गेली होती. पाठारे हे एकटेच दुकानात बसले होते. पाऊस जास्त असल्याने दुकानात ग्राहक नसल्याने सकाळी अकरा वाजता ते गावात फेरफटका मारायला गेले. काही मीटर अंतरावर गेले असता मागे जोरदार आवाज झाला परत येऊन पाहतात तर राहते घर व दुकान जमीनदोस्त झाले. त्यांच्या घरावर दरड कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले. या घटनेने त्यांना अश्रू अनावर झाले. घटनेची माहिती मिळताच मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी घटनास्थळी जाऊन भेट संबंधित भागाची पाहणी केली.
  तुंग गावात ३०० मीटर लांब भेग  पडल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी राहण्याच्या सूचना या वेळी तहसीलदार दिल्या आहेत. तुंग गावातील गावठाणातील नागरिकांचे पुनर्वसन करणे आवश्यक असून, याबाबतची ग्रामस्थांची बैठक तहसील कार्यालयत आज होणार आहे.
  पुनर्वसनासाठी पर्यायी जागा पाहून याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे तहसीलदार बर्गे यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे, मंडळ अधिकारी प्रकाश बलकवडे, तलाठी एस. एम. दगडे, सरपंच वसंत मस्कर, उपसरपंच शांताराम पठारे, पोलीस पाटील गणपत ठोंबरे, तुकाराम ग्रामसेवक आप्पा भानवसे आदी उपस्थित होते.
  ग्रामसेवकाचा हलगर्जीपणा ग्रामस्थांचा आरोप
  ग्रामसेवक दोन दिवसांपासून घटनास्थळी येत नसल्याने ग्रामसेवक कामांमध्ये हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
  प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी; तूंग ग्रामस्थांकडून तहसीलदारांना निवेदन
  तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी मोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने पुढील काही दुर्घटना घडू नये. याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.