भीमा नदीवरील बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा मंजूर

राजेगाव : भीमा नदीवरील बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.

 आमदार राहुल कुल यांची माहिती

राजेगाव : भीमा नदीवरील बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील भीमा नदीवरील देऊळगाव राजे, कर्जत तालुक्यातील औटेवाडी, श्रीगोंदा तालुक्यातील सिद्धटेक या ठिकाणी भीमा नदीवर बुडीत बंधारे बांधण्यासाठी सर्वेक्षण करण्यासाठीची निविदा सूचना आज जाहीर करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील देऊळगावराजे, पेडगाव, वाटलुज, हिंगणीबेर्डी, नायगाव, राजेगाव व खानोटा या भागातील शेतकऱ्यांची शेतीची सिंचन योजना व पाणी पुरवठा योजना उजनी धरणाच्या फुगवटा क्षेत्रावर अवलंबून आहेत. उजनी जलाशयातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर पाणी उपसण्यासाठी शेतकऱ्यांना व पिण्याच्यापाणी पुरवठा योजनांनाची लांबी वाढून पाणी घ्यावे लागते तसेच हे पाणी संपल्यानंतर त्या ठिकाणी शेतीला व पिण्याला पाणी उपलब्ध नसते अशी परिस्थिती तालुक्यातील या भागात होत असल्याचे आमदार राहुल कुल यांनी वारंवार होणाऱ्या बैठकांमध्ये नमूद केले होते. आमदार कुल यांनी बुडीत बंधारे करण्याचा प्रश्न सातत्याने लावून धरत विधानसभेत यापूर्वी देखील अनेक वेळा पाठपुरावा केला असून, त्यानुसार बैठक होऊन भीमा नदीत बुडीत बंधारे करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला होता.
तसेच नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दि. १३ मार्च २०२० रोजी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले कि, बुडीत बंधारे बांधणेबाबत समिती स्थापन करण्यात आली असून, दौंड तालुक्यातील आवश्यक त्याठिकाणी बंधारे बंधानेबाबत कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन यांनी दिले होते. त्यानंतर या समितीच्या शिफारसीनुसार बुडीत बंधाऱ्यांच्या सर्वेक्षणासाठी निविदा काढण्यात आली असल्याचे ही कुल यांनी सांगितले.