राज्यातील ठाकरे सरकार हे संवेदना गमाविलेले सरकार : विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर

-भाजपा दौंड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न

पारगाव  : राज्यातील ठाकरे सरकार हे संवेदना गमाविलेले सरकार आहे. राज्यातील जनतेवर अन्याय करण्याचे काम या सरकारने गेल्या वर्षभरात केले आहे. या सरकारमध्ये राज्य नावाची यंत्रणा अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. महाविकास आघाडीमधील तिनही पक्षांचा एकमेकांमध्ये ताळमेळ नाही, समन्वय नाही. फक्त एकमेकांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. वैयक्तिक स्वार्थाने पछाडलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने कॉंग्रेसची फरफट चालवली आहे. पण तिन्ही पक्षाने फक्त सत्तेसाठी लाचारी पत्करली असल्याची टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली.

दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांच्या निवासस्थानी राहू येथे पुणे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजपा दौंड तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, एसटी कर्मचा-यांना पगार मिळत नव्हता तेव्हा आपण दबाव आणला आणि तेव्हा २-३ महिन्याचा पगार त्यांना देण्यात आला. ऊर्जा मंत्री आणि सरकारने १०० यूनिट पर्यंत मोफत वीज देऊ ही घोषणा केली. पण नंतर सवलतीच्या दरात सूटही दिली नाही. आता हे सरकार जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचं पाप हे सरकार करतेय अशी टिकाही दरेकर यांनी केली.

भाजपा सरकारच्या काळात राज्याने गेल्या पाच वर्षात विकास बघितला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांचे युवा नेतृत्व महाराष्ट्राला वेगळेया प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करित होते, पण त्यामध्ये आता ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे खंड पडला आहे. त्यामुळे पदवीधर व शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महत्त्वाची आहे असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.

संग्राम देशमुख यांच्या रूपाने सहकार क्षेत्रातील एक अनुभवी उमेदवार पुणे पदवीधरसाठी भाजपने दिला आहे. त्यामुळे मतदान करताना दौंड तालुक्याचा खारीचा नव्हे, तर सिंहाचा वाटा असला पाहिजे, असे मत व्यक्त करताना प्रविण दरेकर म्हणाले की, पदवीधरांच्या प्रश्नांची जबाबदारी आमची आहे. पदव्या घेऊन बाहेर पडणारा मोठा युवा वर्ग असून त्यांना नोकरी व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उत्तम संधी देण्याच्या योजना आमचे उमदेवार संग्राम देशमुख यांच्यामार्फत आखून त्याला दिशा देण्याचे प्रयत्न करु असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार राहुल कुल, माजी आमदार रंजना कुल,किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वासुदेव काळे, महिला जिल्हा अध्यक्ष कांचन कुल, सरचिटणीस अविनाश मोटे, तानाजी दिवेकर, तालुका अध्यक्ष माऊली ताकवणे, जिल्हा संघटक गणेश आखाडे, तानाजी थोरात आदि मान्यवर उपस्थित होते.