कोरोना काळात अव्वाच्या सव्वा बिलं लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांवर पुन्हा मेहरबानी?

पालिकेच्या रुग्णालयांसह कोविड सेंटर पुन्हा खासगी रुग्णालयांच्या दावणीला? ; शिवसेनेच्या विजय गुप्तांचा पालिकेला सवाल

    पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. वैद्यकीय उपाययोजना करून ठेवण्याचे निर्देश शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार उपाययोजना सुरु आहेत. मात्र, ‘दुधाने तोंड भाजलं तरी, ताक फुंकून प्यावं’ अशी स्थिती असताना महापालिकेने चक्क कोविड केअर सेंटर, वायसीएम, जिजामाता, भोसरी व नव्याने तयार झालेले आकुर्डी व थेरगाव या रूग्णालयांसह आयसीयू विभागाचे संचलन थेटपणे खासगी रूग्णालयांकडे देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यासाठी एकत्रित निविदाही काढली जाणार आहे. रूग्णसंख्या वाढल्यानंतर संबंधित खासगी रूग्णालय व संस्थेशी करार केला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाण्याच्या प्रकाराला आयतंच आवतन मिळणार आहे, असा आरोप शिवसेनेचे पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी महापालिकेच्या कारभारावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
    पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे की, महापालिकेचे वायसीएम, जिजामाता, भोसरी, आकुर्डी व थेरगाव रूग्णालय व आयसीयू विभाग खासगी संस्थांना चालविण्यास देण्यात येणार आहेत. रूग्ण संख्या वाढल्यावर पात्र रूग्णालय व संस्थेशी करार करण्यात येणार आहे. रूग्ण संख्या घटल्यास १५ दिवसांपूर्वी ते सेंटर किंवा रूग्णालय बंद करण्याबाबत कळविले जाणार आहे. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये बिल अदा केले जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच, निश्चित केलेल्या दरानुसार सेवा पुरविण्याची अट आहे. मात्र, गतवेळी राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराची मुभा महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेसाहेब यांनी दिली होती. त्याचा गैरफायदा घेत, शहरातील खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांकडून अक्षरशः लुट चालविली. नंतर राज्य शासनाने कोरोना आजार झालेल्या रुग्णांसोबतच अन्य आजारांवरही किती उपचाराचा खर्च लावायचा याचे नियम बनविले. उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून लूट करणाऱ्या खासगी कोविड रुग्णालयांना चाप बसेल, अशी आशा होती. परंतु, निर्ढावलेल्या खासगी कोविड रुग्णालयांनी सरकारच्या आदेशाला फाट्यावर मारत रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले वसूल केली.
    खासगी रुग्णालयांनी आयसीयू, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन याशिवाय सिटीस्कॅन, एक्सरे, एचआरसीटी टेस्टच्या खर्चासाठी गोरगरीब रुग्णांना अक्षरशः घरदार विकून भिकेला लावले. काही महिला-भगिनींनी मंगळसूत्र विकून पतीचा उपचार केला. ओरड झाल्यावर पालिकेने खासगी रुग्णालयांवर कारवाईचे केवळ आश्वासन दिले. तोंडदेखली कारवाई केली. चार दोन सोडले तर बहुतांशी लूट झालेल्या रुग्णांच्या हाती मात्र, काहीच पडले नाही. या प्रकारातून योग्य धडा गिरविण्याऐवजी पालिकेने पुन्हा खासगी रुग्णालयांची तिजोरी भरण्याचा उद्योग सुरु केला आहे, हे सर्व थांबवा अन्यथा शिवसेनेला व्यवस्थेविरोधात आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.

    ''खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल होणाऱ्या गोरगरीब रुग्णांची अडवणूक केली जातेय. तेथील पंचतारांकित उपचाराचा खर्च रुग्णांना परवडणारा नाही. पालिकेने मोकळ्या इमारती काबीज करून त्याठिकाणी रुग्णांची सोय करावी. ठेकेदारांना पोसण्याऐवजी स्वतः आरोग्य भरती राबवावी. मनुष्यबळ उपलब्ध करावे व माफक दरातच रुग्णांवर उपचार व्हावेत.''

    विजय गुप्ता, शिवसेना समन्वयक, पिंपरी विधनासभा