‘त्या’ पुस्तकाला अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे

अँड.सुरेश शिंदे यांची मागणी

कर्जत:  केंद्रीय बोर्डपरीक्षेसाठी इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमात इतिहास या विषयासाठी वाराणसी येथील डॉली हेलन लिखित ‘टोटल हिस्टरी ऑफ सिविक्स’ या पुस्तकाचा समावेश करण्यात आला असुन या पुस्तकाचे संपादक एस. ईरू. दया राज हे आहेत. या पुस्तकात भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन अशा अंतराष्ट्रीय दर्जाच्या विद्वानांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला नाही. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांचा सर्वश्रेष्ठ प्रथम क्रमांकाचे विद्वान म्हणुन गौरव केला अशा महामानवाचा या पुस्तकांमध्ये समावेश नसणे म्हणजे संपुर्ण देशाचा,भारतीयांचा, पुरोगामी विचाराचा व फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा अवमान आणि अपमान आहे. या पुस्तकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा समावेश न केल्यास हे पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्यात यावे किंवा रद्द करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे जिल्हाध्यक्ष अँड.सुरेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे. डॉ.आंबेडकरांचा या पुस्तकांमध्ये समावेश नसणे म्हणजे विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकविला जाणार आहे असा चुकीचा इतिहास शिकवून काय उपयोग आहे? आजचा तरुण विद्यार्थी आधुनिक भारताचे भविष्य आहे त्यामुळे त्यांना खरा इतिहास समजणे आणि शिकवने आवश्यक आहे. पुस्तकाच्या संबंधित लेखकांना जागतिक किर्तीच्या विद्वानाबाबत खरी माहिती नसावी किंवा जागतिक किर्तीचे विद्वान नक्की कोण आहेत हे त्यांचे अज्ञान असावे म्हणुनच त्यांनी या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

-खरा इतिहास जाणुन-बुजून लपवण्याचा प्रयत्न
या पुस्तकाच्या माध्यमातून जाणुन-बुजून खरा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला असुन या पुस्तकाच्या लेखकाचा व संपादकांचा निषेध करत डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा समावेश करण्यासाठी शासनावर दबाव आणावा त्यासाठी कायदेशीर मार्गाने रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा प्रसंग आला तरी कार्यकर्त्यांनी मागेपुढे पाहू नये असे आवाहनही अँड. सुरेश शिंदे यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात केले आहे.