प्री-वेडींग शुटींगच्या नादात खावी लागली तुरुंगाची हवा….

एअरफोर्स स्टेशन परिसरात एक जण ड्रोन उडवून शुटिंग करत असल्याची माहिती आयएनएस शिवाजी येथील नेव्हल पोलिसांकडून लोणावळा शहर पोलिसांना देण्यात आली.

    पुणे: लग्नापूर्वी प्री वेडिंग फोटोशूट (pre-wedding photoshoot)करण्याची क्रेझ अलीकडच्या काळात खूप वाढलेली दिसून येते. अनेकदा या प्री- वेडिंगसाठी जीव धोक्यात घालूनही शूट केले जाते. सार्वजिनक ठिकाणी शूट करताना तर हमखास नियमाची पायमल्ली केली जाते, यातून अनेकदा पोलीस कारवाईच्या घटनाही समोर आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार लोणावळ्यात घडला आहे.

    प्री वेडिंग फोटोशूटसाठी आयएनएस शिवाजी कॅम्प मुख्य प्रवेशद्वार आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात (INS Shivaji Camp Main Entrance and Air Force Station Premises) ड्रोन उडवणाऱ्या तरुणाला लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकटेश तेजस बोमन्ना (वय २६, रा. जनता वसाहत गल्ली, पर्वती, पुणे) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

    पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याबाबत माहिती दिली. आयएनएस शिवाजी मुख्य प्रवेशद्वार आणि एअरफोर्स स्टेशन परिसरात एक जण ड्रोन उडवून शुटिंग करत असल्याची माहिती आयएनएस शिवाजी येथील नेव्हल पोलिसांकडून लोणावळा शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख (Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh)यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांना आदेश दिले. त्यानुसार, शोधमोहिम राबवून बोमन्ना याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता प्री-वेडींग शुटींग करत असल्याचे त्याने सांगितले. विनापरवाना ड्रोन उडविणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार, पोलीसांनी त्याच्यावर भारतीय दंड विधान काम १८८ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.