सत्ताधाऱ्यांची ठेकेदारांवर कोट्यवधींची उधळपट्टी, घंटागाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्ताव मान्य करू नये ; मनसेचा महापालिका आयुक्तांना इशारा

वित्तिय तूट भरून काढण्यासाठी महापालिका नागरिकांच्या करांमध्ये वाढ करत आहे. ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. असे असताना दुसरीकडे ठेकेदारांवर मेहेरनजर दाखवून याच पैशांची उधळपट्टी करत आहे. आयुक्तांनी या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देउ नये अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संभूस यांनी दिला आहे.

    पुणे : वित्तीय तूट भरून काढण्यासाठी महापालिका नागरिकांवर करांचा बोजा वाढवत असताना याच जनतेच्या पैशांवर ठेकेदारांचे उखळ पांढरे करण्यात येत आहे. कचरा गोळा करण्याचे जे काम महापालिकेला ३७ कोटी रुपयांमध्ये शक्य आहे तेच काम ठेकेदारा मार्फत ७४ कोटी रुपये खर्चून केले जाणार आहेत. महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी देउ नये, अशी मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

    मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत संभूस यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, महापालिकेच्या एका झोनच्यावतीने त्या झोनमधील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडया आणि कॉम्पॅक्टर सात वर्षासाठी भाडेतत्वावर घेण्यासाठी एस्टीमेट तयार केले आहे. यासाठी ड्रायव्हर व बिगार्‍याचा पगार मिळून ७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला आहे. समाविष्ट गावांसह महापालिकेचे जवळपास ७ झोन तयार झाले आहेत. परंतू एवढ्या दीर्घकाळासाठी ही वाहने भाडेतत्वावर घेण्यापेक्षा तेवढीच वाहने महापालिकेने खरेदी केल्यास व त्यावर ड्रायव्हर व बिगारी नेमल्यास वर्षाकाठी ३७ कोटी रुपये खर्च येणार आहे. एका झोनमध्ये दरवर्षी ३७ कोटी तर सात वर्षात हाच खर्च २६० कोटी रुपयांनी अधिक होणार आहे. सातही झोनमध्ये हीच कार्यपद्धती वापरल्यास हा आकडा शेकडो कोटीं रुपयांचा होईल, असा दावाही संभूस यांनी केला आहे.

    वित्तिय तूट भरून काढण्यासाठी महापालिका नागरिकांच्या करांमध्ये वाढ करत आहे. ऍमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्यात येत आहेत. असे असताना दुसरीकडे ठेकेदारांवर मेहेरनजर दाखवून याच पैशांची उधळपट्टी करत आहे. आयुक्तांनी या संदर्भातील प्रस्तावाला मान्यता देउ नये अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संभूस यांनी दिला आहे. याप्रसंगी मनसेचे गटनेते साईनाथ बाबर, योगेश खैरे, अनिल राणे, विशाल शिंदे, संतोष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.