प्रकृती चिंताजनक असतानाही ‘आयसीयू’त उपचार घेणाऱ्या बाळाचा ऑक्सिजन केला बंद

लहान बाळ आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे, हे माहिती असताना देखील आरोपींनी आयसीयू बोर्डला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपचा कॉक बंद करून बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला.

    पिंपरी: आयसीयू वॉर्डमध्ये उपचार सुरू असलेल्या बाळाचा ऑक्सिजन पुरवठा तिघांनी बंद केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमाटणे फाटा येथील जीवन हॉस्पिटलमध्ये आयसीयू वॉर्डात दत्तात्रश् वावरे यांच्या बाळावरउपचार सुरु होते. वावरे आणि त्यांच्या पत्नी आयसीयू वॉर्डच्या बाहेर बाकावर बसले होते. त्यावेळी आरोपी हॉस्पिटलमध्ये आले. आरोपींनी वावरे आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ व दमदाटी केली. लहान बाळ आयसीयू वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे, हे माहिती असताना देखील आरोपींनी आयसीयू बोर्डला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पाईपचा कॉक बंद करून बाळाच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला.

    याबाबत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दोघेजण डॉक्टर आहेत. डॉ रमेश सोनवणे, डॉ भूषण सोनवणे आणि हर्षल सोनवणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

    याबाबत दत्तात्रय एकनाथ वावरे (वय २८, रा. नायगाव, ता. मावळ) यांनी गुरुवारी (दि. २४) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी हिंदुस्थानी दंड विधान कलम ३०८, ३३६, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.