शिक्रापुरात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

मृतदेहाबाबत तर्कवितर्क
शिक्रापूर : (ता. शिरूर) येथे दोन दिवसापूर्वी एका इसमाचा मृतदेह आढळून आलेला असताना अचानक सणसवाडी येथे देखील एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना ताजी असताना आता शिक्रापूर येथे देखील एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला असल्याने खळबळ उडाली आहे.  शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर ) येथील समाज मंदिर जवळ राहणारे दिलीप चव्हाण हे त्याच्या घराजवळील एका मोकळ्या खोलीत कपडे वाळण्यासाठी टाकण्यास गेले असताना शेजारील घरातून उग्र वास येत असल्याचे त्यांना जाणवले. यावेळी चव्हाण यांनी शेजारील खोलीत पाहिले असता एका पुरुषाचा मृतदेह असल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ रानगट, पोलीस हवालदार पुनाजी जाधव, पोलीस शिपाई अमोल रासकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.  दरम्यान इसमाबाबत काहीही माहिती अथवा त्याचे नातेवाईक मिळू शकले नाही. मृतदेहाची पाहणी केली असता तोंडाचा भाग विद्रूप झाल्याचे दिसले तर सदर मृतदेह तीन ते चार दिवसांचा असल्याचा अंदाज वर्तविला जात असल्याने या इसमाच्या मृतदेहाबाबत तर्कवितर्क बोलले जात आहे. याबाबत तेजस दिलीप चव्हाण (वय १८ वर्षे रा. समाजमंदिर जवळ शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे)  यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली असल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.