बंदी असतानाही सुरु होती बैलगाडा शर्यत, पोलिस आले अन्…

    भोर : सर्वोच्च न्यायालयाची बंदी असतानाही बैलगाडा शर्यतींचे आयोजन करून वेल्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगररांगावर बिनदिक्कतपणे शर्यती भरवून बैलगाडा पळवीत असल्याची खबर समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलिसांची कुणकुण लागताच आयोजक आणि बैलगाडा मालकांनी पळ काढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांनी गर्दी जमा केल्याप्रकरणी दंडात्मक किरकोळ कारवाई केल्याचे समजते. याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

    वेल्हा तालुक्यातील एका नामांकित रिसॉर्टजवळ असलेल्या सुरवड गावच्या हद्दीत पहाटे बैलगाडा शर्यती पार पडल्याचे वृत्त वाऱ्यासारखी पसरताच वेल्हा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी तातडीने पोलीस कर्मचारीसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान सहभागी बैलगाडा मालक आणि आयोजक यांनी पळ काढला. तर घटनास्थळी गर्दी केल्याप्रकरणी प्रमुख मोरख्या अलगुडे नामक व्यक्तीसह दहा ते बारा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलिसांच्या राजकीय दबावतंत्र असल्याचे समजते. पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करून बैलांना निर्दयी वागणूक देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणीमित्र संघटना मधून होत आहे.

    समजलेल्या माहितीनुसार, बैलगाडा शर्यत बाबत राजगड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करण्याचे धोरण घेतल्याने बैलगाडा आयोजकांनी वेल्हा तालुक्यात शिरकाव केला आहे. सुरवड येथील हद्दीत डोंगर माळावर जवळपास ३० ते ३५ बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला असल्याची माहिती समोर येत असून घटनास्थळी पोलिस जाण्यापूर्वी शर्यतीचे दोन फेरी सुद्धा झाल्याचे चर्चा होत आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार याबाबत विचारणा केली असता त्यांनी घटनस्थळी काही जणांनी गर्दी केली होती. यावेळी बैलगाडा शर्यत पार पडली नसून शर्यत उधळून लावल्याचा ही दावा केला आहे. वेल्हा पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत कार्यवाही करण्याचे काम सुरू होते.