शहरात नालेसफाईचा बोजवारा ; पाणीच पाणी चोहीकडे

पुणे : पुणे शहरात बुधवारपासून (दि. १५) पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. महापालिका कितीही नालेसफाईचा दावा करीत असली तरी शहरातील रस्त्यायांना नदीचे स्वरूप आले आहे. या पावसामुळे २५ सप्टेंबरची आठवण झाली. कोथरूड, हडपसर, शहरातील मध्यवर्ती भाग, पेठा, कर्वेनगर – वारजे, शिवणे – उत्तमनगर परिसरात मुसळधार पाऊस झाला. नदी – नाले खडखडून वाहत आहे. घाण पाणी रस्त्यावर आल्याने पुणेकरांनी नाराजी व्यक्त केली. आज सकाळपासूनच पुणे महापालिकेच्या सर्वोपक्षीय नगरसेवकांनी पाहणी केली. सहकारनगर, बिबवेवाडी, मंगळवार पेठ, कोथरूड परिसरातील मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. अनेक ठिकाणी वीजही गायब झाली होती. त्यामुळे काही पुणेकरांना अंधारात राहण्याची वेळ आली. या पावसासंदर्भात आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त असे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे चर्चा झाली नसल्याचे शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी सांगितले.

– नालेसफाईचा बोजवारा : पृथ्वीराज सुतार, शिवसेना गटनेते
शहरात अचानक झालेल्या या पावसामुळे मागील वर्षीच्या आठवणी ताज्या झाल्यात. पुणेकर अक्षरशः घाबरले होते. महापालिका कितीही नालेसफाई झाल्याचा दावा करीत असली तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही पुणेकरांना नाहक त्रास होत आहे. आज सकाळपासूनच नागरिकांचे फोन सुरू होते. त्यामुळे दुपारपर्यंत सोसायट्याची पाहणी केली आहे.

-महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली कोथरूडमध्ये पाहणी
बुधवारी दिवसभर आणि रात्री मुसळधार झालेल्या पावसाने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. आज सकाळी लवकर कोथरुड येथील नाल्यांच्या परिसरातील भुसार कॉलनी, कुंभरे पार्क या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी करत आढावा घेतला.