अबब ! महानगरपालिका एक वृक्ष खरेदीसाठी मोजणार तब्बल सव्वा पाच लाख रुपये

ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यांनी घेतला आक्षेप

पुणे : भाजपच्या एका स्थानिक नगरसेवकाच्या दबावातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी येथील पुनावाला उद्यानात वृक्षारोपण करण्याकरिता तब्बल सव्वा पाच लाख रुपयांना एक वृक्ष खरेदी करण्याचे टेंडर काढले आहे.

या टेंडरच्या माध्यमातून फक्त ६५ वृक्ष खरेदी केले जाणार असून त्याची किंमत तब्बल ३ कोटी त्रेचाळीस लाख पन्नास हजार एवढी आहे. सन २०१८ साली या कामाचे टेंडर काढण्यात आले होते. त्यामूळे सध्या या कामाची मुदत संपली असताना वृक्ष खरेदी का करायची आहे. हा प्रश्न सर्वांना पडला आहे. शिवाय टेंडरची तब्बल २ वर्षाने मान्यता घेतली जाते हे कोणता नियमात बसते, असा ही प्रश्न विरोधक विचारत आहेत.या विषयी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप यानी बेकायदेशीरित्या सव्वा पाच लाख रुपयांना खरेदी केल्या जाणा-या वृक्ष खरेदी प्रकरणावर आक्षेप घेतले आहेत.

याविषयी बोलताना नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, “या वृक्षांची महानगरपालिकेच्या दरसुचीमध्ये (डीएसआर) मध्ये नोंद नाहीत तसेच इस्टीमेट समितीची मान्यता नसताना हे टेंडर कोणाच्या दबावाखाली काढण्यात आले आहे. २ कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचे मूळ टेंडर असताना टेंडर दरापेक्षा ८५ लाख रुपयये जास्त दराने हे टेंडर आले आहे. टेंडर दर वस्तुस्थिती व बाजार भावाशी सुसंगत नसल्याचे उद्यान विभागाने म्हंटले असताना हे टेंडर मान्यतेसाठी पाठविण्या बाबत सत्ताधारी भाजपाचे नेते प्रशासनावर दबाव टाकत आहेत. महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून वाढीव दरांची टेंडर येण्याचे सत्र थांबायला तयारच नाही. महानगरपालिकेत भाजपच्या काळात भ्रष्ट्राचार शिगेला पोहचला आहे. महानगरपालिकेतील भ्रष्ट्राचाराबाबत सत्ताधारी भाजपाचा खास मानपत्र देऊन शनिवार वाड्यावर जाहीर सत्कार करायला हवा. आता एवढेच राहिले आहे.”