त्यावेळच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे युतीचा निर्णय ; पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरेंची भूमिका

ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबतही एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. न्यायालयामध्ये  बाजू का मांडली जात नाही. या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलावून समाजाने विचारणा करायला हवी. मतदान करताना समाज त्यांना जाब विचारीत नाही. आरक्षणाबाबत बातम्यांमधून आणि चर्चांमधून समोर येणारी माहिती वरवरची असल्याचेही ते म्हणाले.

  पुणे: राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका फेब्रुवारी – मार्चमध्ये होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सध्या भाजप पक्ष पुणे महापालिकेत सत्तेत आहेत. पुणे महापालिका निवडणुकांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. “निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे त्याचे नियोजन नंतरच करण्यात येईल. महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यावेळच्या राजकीय परिस्थितीप्रमाणे कोणासोबत युती करायची याचा निर्णय घेईल.” असं ते म्हणाले आहेत.  कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात असल्याने युतीबाबत काही बोलणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  मनसेच्या नूतन शहर कार्यालयाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शहरप्रमुख वसंत मोरे, अनिल शिदोरे, नेते  बाबू वागस्कर, महिला अध्यक्षा अ‍ॅड. रुपाली पाटील-ठोंबरे, पालिकेतील गटनेते साईनाथ बाबर, गणेश सातपुते आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी मोर्चा निघाला होता. या मोर्चाला राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना, भाजपा अशा सर्वच पक्षांचे नेते सामोरे गेले होते. सर्वांनी त्यावेळी आरक्षणाचा मुद्दा मान्य केला होता. आजही तोच सूर आळवला जात आहे. मग नेमके अडले आहे कुठे असा सवाल त्यांनी केला.

  ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबतही एकमेकांकडे बोट दाखविले जात आहे. न्यायालयामध्ये  बाजू का मांडली जात नाही. या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना एकाच व्यासपीठावर बोलावून समाजाने विचारणा करायला हवी. मतदान करताना समाज त्यांना जाब विचारीत नाही. आरक्षणाबाबत बातम्यांमधून आणि चर्चांमधून समोर येणारी माहिती वरवरची असल्याचेही ते म्हणाले. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये कोण कोणाचा शत्रू आणि कोण कोणाचा मित्र हेच समजेनासे झाले आहे. आज वेगळेच बोलतात तर उद्या वेगळेच बोलतात असेही त्यांनी नमूद केले.

  – नको असलेल्या व्यक्तींना संपविण्याकरिता ईडीसारख्या यंत्रणांचा वापर
  कॉंग्रेस पक्षाच्या सत्ता काळात ईडीचा गैरवापर झालेला आहे. भाजपाकडूनही आत्ता गैरवापर केला जात आहे. तपास यंत्रणा म्हणजे बाहुल्या नाहीत. आपल्याला नको असलेल्या व्यक्तींना संपविण्याकरिता ईडीसारख्या यंत्रणांचा वापर करणे चूकीचे आहे. ज्यांनी प्रत्यक्षात गुन्हे केलेत ते मोकाट सुटलेत.

  -खडसेंच्या ‘सीडी’ची मी वाट पहात
  खडसेंवर कारवाई झाली तरी त्यांची सीडी बाहेर आलेली नाही. तुमच्याकडे ईडी असेल तर मी सीडी लावीन असे खडसे म्हणाले होते. त्यांच्या  ‘सीडी’ची मी वाट पहात असल्याचे ठाकरे म्हणाले.

  -माझा राज मोरे होणार नाही
  “मी नवी मुंबई विमानतळाला नवं नाव देण्याची मागणी केलेली नाही. उद्या जर मी पुण्यात शिफ्ट होण्याचा विचार केला तर माझ नाव राज मोरे होणार नाही. (मनसेच्या शहर अध्यक्ष वसंत मोरे यांच नाव आहे). त्यामुळे मुंबई विमानतळ शिफ्ट होत असेल तर नाव कसं बदलेल?,” अशी विचारणा राज ठाकरे यांनी केली.

  राज उवाच…
  १. लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारचा कारभार दिसलाच नाही. त्यामुळे समाधान कशावर व्यक्त करायचे?
  २. नाना पटोले यांनी भाजपाच्या कारभारासाठी इंजिनाचा दाखला दिला. पण, तुर्तास मी माझे इंजिन नीट करतोय.
  ३. केंद्राच्या सहकार मंत्रालय आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याबद्दल शरद पवारांना विचारले तर अधिक सोईचे होईल.
  ४. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांनाही फोन केला होता. मात्र, फोन बंद होते. एक-दोन दिवसात पुन्हा फोन करुन  अभिनंदन करणार.