श्वानाला चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून खाली फेकले

सात महिन्यांच्या श्वानाला चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून खाली फेकल्याची अमानुष घटना पिंपरी चिंचवड़ शहरात उघड़कीस आली आहे.

पिंपरी: सात महिन्यांच्या श्वानाला चौथ्या मजल्यावरील गच्चीवरून खाली फेकल्याची अमानुष घटना पिंपरी चिंचवड़ शहरात उघड़कीस आली आहे. या घटनेत श्वान गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी फरीनजहाँ शेख यांनी पोलिसात फिर्याद दिली असून सांगवी पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भटका श्वान हा फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात फिरत असायचा. तो त्यांच्याकडेच खाण्यासाठी येत असे. शनिवारी सकाळी श्वान न आल्याने त्याची वाट पाहिली. परंतु बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्याचा आवाज त्यांना ऐकायला आला. त्याला पाहिले असता त्याचे तिन्ही पाय हे जायबंदी झाले होते. तो गंभीर जखमी झाला होता. तसेच अत्यंत वेदनेमध्ये होता असं फिर्यादी यांनी सांगितलं. त्याला तातडीने श्वानाच्या रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला.

ही घटना पिंपळे गुरव येथील सुदर्शन नगर येथे घडली आहे. दरम्यान, शेजारीच असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून त्याला रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा संशय फिर्यादी यांनी व्यक्त केला आहे. त्याला तेथील गच्चीवर नेऊन मारहाण करण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.