कवठे येमाईत कोरोनाचा उद्रेक ; गाव कडकडीत बंद राहणार

-नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा ग्रामपंचायत प्रशासनाचा इशारा

    कवठे येमाई : शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील मोठे गाव असलेल्या कवठे येमाई गावात कोरोना संसर्गाचा उद्रेक झाला असून एकूण ६५ रुग्ण अॅक्टिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून मिळाली आहे. दक्षता म्हणून गाव दि.२१ मे ते ३० मे पर्यंत कडकडीत बंद राहणार असून नियम मोडणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाईचा ग्रामपंचायत प्रशासनान दिला आहे.

    गावच्या सरपंच मंगल रामदास सांडभोर व ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत एक पत्रक काढले असून गावात दवंडीद्वारे नागरिकांना वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. बंद काळात चोरून, लपून दुकाने चालविणाऱ्यांवर २ हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून विशेषकरून बस स्थानक, बाजारस्थळ परिसरात विनाकारण बसणाऱ्यांवरही आता ग्रामपंचायत प्रशासन दंडात्मक कारवाई करेल,असा इशारा ही सरपंच सांडभोर यांनी दिला आहे.

    बंद काळात नागरिकांना वचक बसावा म्हणून पोलीस प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असून निदान कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर गावातील अवैधधंदे पूर्ण बंद करावेत असे आवाहन ही सरपंच सांडभोर यांनी केले आहे.गावात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करून आपण, आपले कुटुंब व गावातील नागरिक यांचे आरोग्य सुरक्षित राहील यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे कार्यकुशल सदस्य डॉ.सुभाष पोकळे, सरपंच मंगला सांडभोर, उपसरपंच निखिल घोडे, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव पानगे यांनी केले आहे.

    कवठे येमाईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. गावात जर कोणताही अवैध धंदा सुरु दिसून आला तर पोलीस प्रशासनाकडून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल. कवठे येमाईत आगामी बंद काळात पोलीस बंदोबस्त तैनात केला जाईल. कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करून नागरिकांनी घरीच सुरक्षित थांबावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करतील.नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करावे.

    - बिरुदेव काबुगडे, सहायक पोलीस निरीक्षक, शिरूर