यंदा चोंडीला जाऊ शकले नाही याची हुरहूर ; खा. सुळे यांनी भावनिक पोस्ट

बारामती : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. रयतेसाठी प्रत्यक्ष माता होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या या दैवतास अभिवादन करण्यासाठी न चुकता खासदार सुप्रिया सुळे चोंडीला जात असतात.

बारामती : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती. रयतेसाठी प्रत्यक्ष माता होऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या या दैवतास अभिवादन करण्यासाठी न चुकता खासदार सुप्रिया सुळे चोंडीला जात असतात. यंदा कोरोनामुळे लागू झालेल्या टाळेबंदीत हा त्यांचा क्रम चुकला. ही हुरहूर मनाला लागल्याचे सांगत सुळे यांनी अत्यंत भावूक अशी पोस्ट लिहिली असून ती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुशल सेनानी आणि प्रजेच्या सुखदुःखात सतत त्यांच्या बरोबर असलेल्या आदर्श राजकर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर कायमच आपल्यासाठी वंदनीय आणि प्रेरणास्रोत आहेत, असे सांगत सुळे म्हणतात, ‘रयतेसाठी दैवत असलेल्या या मातेला अभिवादन करण्याचे यावर्षी राहून गेले. ही हुरहूर कधीही विसरता येणार नाही. कोरोनासारख्या सांसर्गिक विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण देश संकटात आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा चोंडी येथे जाऊन अहिल्याबाईंच्या पवित्र स्मृतींसमोर नतमस्तक होता येत नाही. जनतेची गाऱ्हाणी ऐकून त्यांची तात्काळ तड लावण्याचे अद्भुत कसब अहिल्याबाई यांच्याकडे होते. केवळ राज्यकर्त्याच नाही तर त्या एक कुशल सेनानी आणि न्यायप्रिय दैवत होत्या. त्यांच्या या असंख्य गुणांची आज आपण आठवण करुयात. त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.