जिलेटिनच्या काड्यांच्या स्फोटाने परिसर हादरला ; पोलिसांनी केली कारवाई

जिलेटिन काड्यांच्या स्फोटामुळे जवळ असणार्‍या हॉटेल मल्हार वाडा जवळ,आरटीओ रोड लगत, झेंडेमळाच्या परिसरात झालेल्या स्फोटाने सवाई हॉटेलला देखील तडे गेले असून एका कारचे मोठे नुकसान झाले आहे.

    सासवड: झेंडेवाडी परिसरातील झेंडेमळ्यात जिलेटिनच्या काड्यांचा स्फोट झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. स्फोटामुळे एक किलोमीटर परिसरात हादरा बसल्याचे काही नागरिकांनी यावेळी सांगितले. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. स्फोटाच्या तीव्रतेमुळे जवळ असणार्‍या हॉटेल मल्हार वाडा जवळ,आरटीओ रोड लगत, झेंडेमळाच्या परिसरात झालेल्या स्फोटाने सवाई हॉटेलला देखील तडे गेले असून एका कारचे मोठे नुकसान झाले आहे.

    याप्रकरणी कालीदास संपत झेंडे (रा.झेंडेवाडी, ता. पुरंदर) यांनी याबाबत सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून गणेश जयसिंग सरक व अन्य एकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांपैकी गणेश सरक या आरोपीस अटक केली आहे. अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी दिली.

    कालिदास संपत झेंडे यांच्या हॉटेलच्या मागे शेताच्या बांधावर जिलेटिन कांड्याचा स्फोट झाल्याने झेंंडे यांचे मल्हार वाडा हॉटेल व शिवाजी विश्‍वास कटके यांच्या मारुती इको गाडी नंबर (एम एच १२टी. एच ०८१२) हिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तर सवाई हॉटेलचे भिंतींना आतून तडे गेले आहेत.

    याप्रकरणी आरोपी गणेश जयसिंग सरक (रा. मिरगाव ता. फलटण जि. सातारा) याने बेकायदेशीरपणे जिलेटीनच्या कांड्या इंदापूर येथील खाडेकडून घेऊन ताब्यात बाळगल्याने जिलेटिन सारखा पदार्थ कोणतीही दक्षता न घेता हायगईने ठेवल्यामुळे जिलेटिन च्या स्फोटाचा व नुकसानीला कारणीभूत झाल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केले आहे. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब घोलप हे करीत आहेत. दुपारच्या दरम्यान भला मोठा आवाज ऐकू आला त्यानंतर आम्ही परिसराची पाहणी केल्यानंतर हॉटेल मल्हार गडच्या पाठी माघे स्फोट झाल्याचे कळाले यानंतर आमच्या हॉटेलची पाहणी केली असता हॉटेल मधील भिंतींना देखील तडे गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.