मागण्या पूर्ण हाेईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार : ॲड. नरसिंह निकम

-श्रीरामच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ग्रॅच्युइटीसाठी अांदाेलन

फलटण : आमची गॅच्युइटीची रक्कम, थकीत पगार किंवा रजेचा पगार असेल तो आमचा आम्हाला द्या, आमचं कारखाना प्रशासन व नेतेमंडळी यांच्याशी कोणतेही वैर नाही. त्यामुळे आजही आमची चर्चा करण्याची तयारी आहे. परंतू कारखाना प्रशासन व नेतृत्वाची, अशीच जर घमेंड असेल, तर आमची देखील माघार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण आम्ही असेच चालू ठेवणार असल्याचा इशारा फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी दिला आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त कर्मचारी ग्रॅच्युइटीची रक्कम व थकीत पगार आणि रजेचा कामगारांना पगार मिळावा, यासाठी ऐन दिवाळीत फलटण कृती समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली १५० कामगारांना घेऊन साखळी उपोषण चालू आहे. कामगारांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी उपोषणस्थळी, होळी पेटवून श्रीराम कारखाना व्यवस्थापनांच्या नावाने बोंब मारून, शिमगा आंदोलन केले. यावेळी ॲड. नरसिंह निकम बोलत होते.

दिवाळीचा पाडवा सगळ्यांसाठी महत्त्वाचा दिवस असतो, परंतु आज दिवाळीच्या पाडव्याला या निवृत्त कामगारांना शिमगा आंदोलन काय करावे लागले आहे. गेले आठ दिवस येथे साखळी उपोषण चालू आहे. परंतु कारखाना व्यवस्थापन, कामगारांच्या ग्रॅच्युइटीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याचे दिसत आहे. आम्हाला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे नाईलाजास्तव पाडव्यादिवशी शिमगा आंदोलन करतोय आणि कारखाना प्रशासन व नेतृत्वाचा आम्ही निषेध करत अाहे.

ॲड. नरसिंह निकम, अध्यक्ष, फलटण कृती समिती

– हक्काचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत
सन २०१७ पासून आमचे हक्काचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, आज रामनगरीत दिवाळीचा सण साजरा होतोय, परंतु आज इथे आम्हाला होळीचा सण साजरा करायला लागतोय, यासारखे दुर्दैव नाही. प्रशासनाला, आमची एकच विनंती आहे, आमची चर्चेची तयारी आहे, कुठलाही प्रश्न चर्चेतून सोडवता येतो, प्रशासनाने आमचा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी रवींद्र फडतरे यांनी यावेळी केली.