न्यायासाठी मयत मुलीच्या वडिलांनी गृहराज्य मंत्री आणि विरोधी पक्षनेते यांना घातले साकडे

एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या पाय-या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

    पिंपरी (Pimpri).  एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीने राहत्या घरात स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलीच्या वडिलांनी अनेक दिवस पोलीस ठाण्याच्या पाय-या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील कारवाई करण्यास पोलीस उदासीनता दाखवत आहेत. त्यामुळे न्यायासाठी मयत मुलीच्या वडिलांनी गृहराज्य मंत्री सतेज पाटील आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना साकडे घातले आहे.

    याशिका दीपक ओसवाल (वय 21, रा. तळेगाव दाभाडे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत दीपक प्रकाशचंद ओसवाल यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विक्रांत पाटील (रा. वतननगर, तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मयत याशिका ही तळेगाव दाभाडे येथे क्लासला जात असताना तिची आणि आरोपी विक्रांतची ओळख झाली. ओळखीचा गैरफायदा घेऊन विक्रांत याने याशिका सोबत फोटो काढले तसेच चॅटिंग केले. त्याने काढलेले फोटो आणि केलेले चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन विक्रांतने याशिकाकडून सुमारे अडीच लाख रुपये उकळले. याशिकाने पैसे देऊनही आरोपीची मागणी थांबली नाही. त्याच्या त्रासाला कंटाळून याशिकाने 23 जानेवारी 2021 रोजी राहत्या घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली.

    याबाबत पोलीस ठाण्यात वारंवार चकरा मारल्यानंतर तसेच अनेक विनंत्या केल्यानंतर 19 फेब्रुवारी 2021 रोजी तळेगाव दाभाडे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा (भारतीय दंड विधान कलम 306, 504) गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात केवळ विक्रांत यालाच आरोपी करण्यात आले. त्याच्या अन्य साथीदारांची नावे पोलिसांनी वगळली. मुलीच्या आत्महत्येसाठी विक्रांत प्रमाणेच अन्य तिघेही तितकेच जबाबदार असल्याचे सांगून देखील तळेगाव दाभाडे पोलिसांनी सहकार्य केले नसल्याचे फिर्यादी दीपक ओसवाल यांनी सांगितले.

    आरोपी विक्रांत याने दरम्यान अटकपूर्व जामीन मिळवला. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनसुद्धा तो समाजात मोकाट फिरत आहे. आरोपी विक्रांत हा गुंड प्रवृत्तीचा असून तो आता फिर्यादी यांच्या कुटुंबाला धमकावत आहे. त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहे. त्यामुळे विक्रांत पाटील याचा मंजूर झालेला जामीन तात्काळ रद्द व्हावा. त्याला अटक व्हावी. त्याच्या अन्य साथीदारांना देखील आरोपी करावे. आरोपींवर खंडणीचा देखील गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी योग्य ते सहकार्य करावे, अशी मागणी मयत मुलीच्या पालकांनी केली आहे.

    मुलीच्या वडिलांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना निवेदन दिले आहे. प्रवीण दरेकर यांनी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना याबाबत पत्र लिहिले आहे. अर्जदारास योग्य तो न्याय मिळण्याची मागणी दरेकर यांनी गृहराज्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली आहे. त्यानंतर ओसवाल यांनी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना देखील पत्र दिले आहे.